विभागीय आयुक्तांकडून 'एसडीएम'ची कानउघडणी; 'त्या' ठेकेदारावर गुन्हा

Sunil Kendrekar
Sunil KendrekarTendernama

औरंगाबाद (Aurangabad) : पैठण तालुक्यातील घारेगाव येथील सुखना नदीत अतिरिक्त वाळूचे उत्खनन करणाऱ्या 'त्या' ठेकेदाराला अभय देणाऱ्या पैठण-फुलंब्रीच्या एसडीएमची विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी चांगलीच कानउघडणी केली. यासंदर्भात ठेकेदारावर पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र केवळ कानउघडणीवर समाधान व्यक्त करत केंद्रेकरांनी एसडीएमसह इतर अधिकाऱ्यांना अभय का दिले असे अनेक प्रश्न उपस्थित करत महसुल विभागात चर्चा सुरू आहे. 

Sunil Kendrekar
शिंदेजी, आणखी एक मेगा प्रोजेक्ट निसटला अन् महाराष्ट्र ४०० कोटीना..

काय आहे प्रकरण

औरंगाबाद जिल्हा गौण खनिज अधिकारी कार्यालयामार्फत पैठण तालुक्यातील घारेगाव परिसरातील वाळूपट्ट्याचे टेंडर काढण्यात आले होते. त्यात सलीम पटेल या इच्छुक ठेकेदाराने अधिक दराने टेंडर भरल्याने त्याला १० फेब्रुवारी २०२२ रोजी वाळूपट्टा मंजूर केला होता. टेंडरच्या अटीशर्तीनुसार केवळ २,९६८ ब्रास वाळू उत्खननाचा परवाना दिला होता. मात्र पटेल यांनी अटीशर्तीतील गौण खनिज कायद्याचा भंग करत पोकलॅन्ड व जेसीबीच्या सहाय्याने नदीचे पोट फाडत २,३३४  ब्रास जास्तीचे वाळू उत्खनन केले. ठेकेदाराच्या मनमानी कारभाराविरीधात घारेगावातील ग्रामस्थांनी तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसिलदार, तहसिलदार व एसडीएम ते जिल्हाधिकारी सर्व पातळीवर तक्रारी केल्या मात्र त्यांना कुठेही न्याय मिळाला नाही. अखेर ग्रामस्थांनी  याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने वाळूपट्ट्याला स्थगिती दिली. तरीही जिल्हा व महसुल प्रशासन बघत नव्हते. ग्रामस्थांनी न्यायालयाचे आदेश दाखवत पुन्हा महसुल व जिल्हा प्रशासनाकडे ठेकेदारावर कारवाईसाठी ससेमिरा लावला. अखेर विलंबाने का होईना महसुल प्रशासनाने जूनमध्ये 'ईटीएस' मशीनद्वारे सदर वाळूपट्ट्याची मोजणी केली. त्यात जास्तीचे उत्खनन झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर पैठण-फुलंब्रीचे एसडीएम स्वप्निल मोरे यांनी ठेकेदार सलीम पटेल याला ७ कोटी २० हजार रूपयांची पाचपट दंडासह नोटीस बजावत कारवाईसाठी दंड थोपटले मात्र नंतर वसुलीसाठी थंड झाले. यावर टेंडरनामाने 'आधी सात कोटींसाठी थोपटले दंड; मात्र वसुलीसाठी 'एसडीएम' झाले थंड'  या मधळ्याखाली  १० नोव्हेंबर रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित केले.

Sunil Kendrekar
शिंदे-फडणवीसांमुळेच रखडली मोदींची बुलेट ट्रेन; 'गोदरेज'चा घणाघात

विभागीय आयुक्तांकडून कान उघाडणी

टेंडरनामाच्या वृत्ताची दखल घेत विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी एसडीएम स्वप्निल मोरे यांची तब्बल तासभर कान उघाडणी केली. ( मुळात या प्रकरणी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांण्डेय यांनी दखल घेणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही ) या जिल्हास्तरीय प्रकरणाची थेट विभागीय आयुक्तांनी तातडीने आदेश दिल्यानंतर पैठणच्या मंडळ अधिकारी वैशाली कांबळे यांनी पाचोड पोलिसांत ठेकेदार सलीम पटेल याच्या विरोधात फिर्याद दाखल केली. त्यावरून पाचोड पोलिस ठाण्यात भादंवि ३७९ व गौण खनिज अधिनियम २१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

टेंडरनामाच्या वृत्तावर शिक्कामोर्तब

वैशाली कांबळे यांनी फिर्याद दाखल करताना टेंडरनामा वृत्ताचा दाखला देत सुखना नदीपात्रातील घारेगाव येथील वाळूपट्टा पैठण तालुक्यातील कुरणपिंप्री येथील पटेल यांना १० फेब्रुवारी २०२२ रोजी मंजूर केला होता.जुन २०२२ पर्यंत वाळू उत्खननाची मुदत होती. या काळात 'ईटीएस' मोजणीच्या अहवालानुसार वाळूपट्ट्यातून २, ३३४ ब्रास वाळूचे जास्तीचे उत्खनन केले. उपविभागीय अधिकाऱ्यांनी ७ कोटी २० हजार रूपये दंडाची नोटीस बजावली असल्याचे फिर्यादीत नमुद केले आहे. 

Sunil Kendrekar
विकास आराखड्यातील रिंगरोडच गायब; लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांचे मौन

कानउघडणीत पटाईट, केंद्रेकरांचे मोरे यांना अभय का?

घारेगाव येथील ग्रामस्थांनी तक्रार करूनही एसडीएम, मंडळ अधिकारी, नायब तहसिलदार, तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रारीकडे कानाडोळा केला. न्यायालयाच्या आदेशानंतर एसडीएम मोरे यांनी ईटीएस मशीनद्वारे मोजणी केली. मोजणीत अतिरिक्त गौण खनिज उत्खनन झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मोरे यांनी ठेकेदाराला ७ कोटीची नोटीस बजावत तब्बल पाच महिने वेट ॲन्ड वाॅच का केली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मोरे यांनी शासकीय कर्तव्यात कसुर केलेला असताना केवळ कान उघाडणी करून वेळ मारून नेणाऱ्या विभागीय आयुक्त सुनिल केद्रेकरांना महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) कायदा १९७९ तसेच २००६ चा दप्तर दिरंगाई कायदा माहित नव्हता का? या कायद्यानुसार दोषींना निलंबित का करण्यात आले नाही. अशी चर्चा महसूल वर्तूळात सुरू आहे.

केंद्रेकर साहेब याकडे लक्ष द्याल काय?

एसडीएम स्वप्निल मोरे यांची विभागीय चौकशी लावा. यात  त्यांच्यावर कोणत्या राजकीय नेत्याचा दबाब होता ?  मोरे यांना वेट ॲन्ड वाॅच मध्ये आर्थिक गणित जुळवायचे होते का ? या प्रश्नांचे उत्तर शोधा. २४ तासात खुलासा करण्याचे मोरे यांनी वाळू ठेकेदार सलीम पटेल याला आदेश दिले होते. त्यानुसार त्याने खुलासा केला होता. परंतु महिना उलटूनही मोरे यांनी कारवाईकडे का दुर्लक्ष केले. या प्रश्नाचे उत्तर शोधा.

हाच तो सलीम पटेल

विशेष म्हणजे बीड येथे सुनिल केंद्रेकर जिल्हाधिकारी असताना याच ठेकेदाराने अतिरिक्त गौण खनिज केल्याप्रकरणी केंद्रेकरांनी मुस्क्या आवळल्या होत्या. हाच तो सलीम पटेल असल्याचे माहित असतांना केंद्रेकरांनी कान उघाडणीवरच समाधान का मानावे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com