
औरंगाबाद (Aurangabad) : जिल्ह्यातील पूल, रस्ते आणि इमारतींसह बड्याबड्या प्रकल्पांचे बांधकाम करणाऱ्या औरंगाबाद येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यालयाच्या इमारत परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. काटेरी झाडा झुडपांची वाढ आणि त्यात वर्षभरापूर्वीच लाखो रूपये खर्च करून दुरूस्त केलेले पण अडगळीत अडकलेले स्वच्छतागृहामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. या समस्यांनी ग्रस्त असलेल्या या कार्यालयातील कारभाऱ्यांच्या दिव्याखालीच अंध कारभाराचे यानिमित्त दर्शन होत आहे.
यासंदर्भात अनेकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्रतिनिधीने ७ नोव्हेंबर रोजी सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागातील वेगवेगळ्या कार्यकारी आणि उप अभियंत्यांच्या कार्यालयांची पाहणी केली असता, कार्यालयाच्या इमारती काटेरी झाडे झुडपे आणि परिसरातील स्वच्छतेचा अभाव या विविध समस्यांच्या कचाट्यात सापडल्याचे दिसून आले. कार्यालयांच्या मुख्य प्रवेशद्वारातच कॅन्टीन परिसरातील खुल्या जागेत साचलेल्या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले आहे.
याच ठिकाणी पूर्वेला संरक्षक भिंतीलगत असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाची वर्षभरापूर्वीच दुरूस्ती करण्यात आली होती. यासाठी जवळपास दहा लाख रूपये खर्च करण्यात आला होता. दुरूस्तीनंतर कुलुपबंद असलेल्या या स्वच्छतागृहाला सद्यस्थितीत चारही बाजूने सांडपाण्याचा वेढा आहे. यामुळे कार्यालयात कामकाजानिमित्त येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे.