शहानुरवाडीतील मार्केटच्या बांधकामात घोळ, 'ते' 1 हजार गाळे कागदावरच

Shahnurwadi Market
Shahnurwadi MarketTendernama

औरंगाबाद (Aurangabad) : श्रीहरी असोसिएट्स प्रा. लि.औरंगाबादचे सचिन मधुकरराव मुळे यांनी शहानुरवाडीतील युरोपीयन मार्केटच्या धर्तीवर आठवडी बाजार या बी.ओ.टी प्रकल्पाचा करार करताना टेंडरमधील अटींचा उघडपणे भंग केला आहे. भाजी उत्पादक शेतकरी आणि फळभाजी विक्रेत्यांच्या आणि ग्राहकांच्या हिताचा कुठेही विचार न करता कराराप्रमाणे युरोपीयन फुड प्लाझाच्या धर्तीवर प्री फॅब्रिकेटेड ट्यूबलर डिटेचेबल कव्हरचे एक हजार गाळे तयार करणे बंधनकारक असताना विकासक सचिन मुळे यांनी त्याला फाटा दिला आहे. याप्रकरणी उपलब्ध झालेल्या कागदपत्रावरून ही बाब समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे २०१३ पासून जागेचा उपभोग घेत असलेल्या या विकासकाकडे गत आठ वर्षांपासून तब्बल ३ कोटी ५६ लाख ७६ हजार ७१४ रूपये थकबाकी आहे.  

Shahnurwadi Market
फडणवीस-गडकरींच्या नागपुरात कंत्राटदाराची मनमानी; काय आहे प्रकरण...

शहानुरवाडी येथील सर्व्हे क्रमांक १२ आरक्षण क्रमांक २६२ ही जागा बी.ओ.टी. तत्वावर ३० वर्षांच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर मे. श्रीहरी असोसिएट्स प्रा.लि.औरंगाबादचे सचिन मधुकरराव मुळे यांना देण्यात आली होती. त्यावेळी तत्कालीन बी.ओ.टी. कक्षप्रमुख सय्यद सिकंदर अली व मुळे यांच्यात सवलत करारनामा देखील झाला होता. टेंडरनुसार कंपनीने ३० लाख ६० हजार वार्षिक भाडे महापालिकेच्या खाती जमा करणे आवश्यक होते. मात्र गत आठ वर्षापासून तब्बल ३ कोटी ५६ लाख ७६ हजार ७१४ रूपये थकबाकी आहे. 

टेंडरमधील अटी-शर्ती प्रमाणे कंपनीने शेतकरी, विक्रेत्यांना उन, वारा आणि पावसापासून संरक्षण मिळावे यासाठी युरोपीयन धर्तीवर प्री फॅब्रिकेटेड ट्यूबलर डिटेचेबल कव्हरचे १.८ × २ चार मीटर आकाराचे  एक हजार गाळे उभारावेत, असे करारात म्हटले आहे. त्याची ४० मिमी एमएसच्या (मध्यम स्टील) पाईप्समध्ये उभ्या आणि आडव्या पध्दतीने उभारणी करावी, तसेच  २५ मिमी एमएस पाईप्समध्ये छताची रचना व ५० मिमी एमएस पाईप्समध्ये वेगळे करण्यायोग्य कनेक्टर, तसेच काढता येण्याजोग्या छताचे आवरण असावे, असा स्पष्ट उल्लेख सवलत करारनाम्यात आहे. दोन्ही गाळ्याच्या मधोमध तीन मीटरचा फुटपाथ तयार करावा असा देखील उल्लेख असताना मात्र टेंडरनुसार कंपनीने सवलत कराराचा भंग केला आहे. 

Shahnurwadi Market
नागपुरातील अनधिकृत ट्रान्सपोर्ट प्लाझाला संरक्षण कुणाचे?

उभारले मंगल कार्यालय

टेंडरमधील अटीशर्तीनुसार कंपनीला आठवडी बाजारसाठीच बी.ओ.टी. तत्वावर दहा हजार स्केअर मीटर जागा विकसित करण्यासाठी दिलेली असताना व तसा १ ऑगस्ट २०१२ रोजी करारनामा देखील झाला असताना कंपनीने आठवडी बाजार व्यतिरिक्त मनोरंजनाचे कार्यक्रम तसेच लग्नसमारंभ, राजकीय सभा आणि इतर कार्यक्रमांसाठी अंदाजे एक हजार स्केअर मीटर जागेत मोठे शेड आणि किचनशेड उभारले व कोट्यावधीची उलाढाल सुरू केली आहे. हे कमी म्हणून की काय येथे खाजगी प्रवासी वाहनांचा थांबा करून कंपनी एका प्रवासी वाहनांकडून दररोज २०० रूपये घेत असल्याचे तपासात समोर आले आहे. एकूणच या बी.ओ.टी. प्रकल्पात टेंडरमधील अटी व शर्तींचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाल्याचे सबळ पुरावे 'टेंडरनामा' प्रतिनिधीकडे उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे आठ वर्षांत महापालिका आणि कंपनीचा भाडेपट्टा नसताना या बेकायदेशीर बांथकामाला आणि तेथे सुरू असलेल्या कार्यक्रमांवर कारवाईचा दिखावा म्हणून बी.ओ.टी. कक्ष प्रमुखांनी कंपनीला नोटीसा पाठवल्या पण ठोस कारवाई केलीच नाही.

भाडेवसुलीसाठी कंपनीचे नियंत्रण असेल, असे टेंडरमध्ये म्हटले होते. मात्र आठशे ते एक हजार विक्रेत्यांकडून वसूली करायला महापालिकेचा एक कर्मचारी नेमला आहे. करारात प्रति गाळा ५० रूपये भाडे व प्रतिवर्षी १२ टक्के वाढ याप्रमाणे वसुली करण्यास टेंडरमध्ये ठरले असताना कराराच्या व्यतिरिक्त भाडे वसुली होत असल्याचे विक्रेत्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. या गैरकारभाराकडे महापालिकेचे बी.ओ.टी. कक्ष प्रमुख व समितीचे दुर्लक्ष असल्याचा संशय बळावत आहे. धक्कादायक म्हणजे जागेचा होत असलेला चुकीचा वापर संशयास्पद आहे.

Shahnurwadi Market
नाशिकमध्ये २०५१ पर्यंतचा विचार करून पाणी पुरवठ्याचा मास्टरप्लॅन

काय म्हणाले अधिकारी?

याप्रकरणी महापालिकेच्या अधिकारी अर्पना थेटे यांच्याशी संपर्क केला असता माझ्याकडे दोन महिन्यापूर्वीच बी.ओ.टी. कक्षप्रमुख म्हणून जबाबदारी आहे. यापूर्वी. एस. डी. काकडे यांच्याकडे कारभार होता. टेंडरमधील तांत्रिक बाबींवर मी भाष्य करणे अयोग्य आहे. माझ्याकडे केवळ प्रशासकीय जबाबदारी असल्याचे म्हणत त्यांनी कारवाईबाबत अधिक बोलने टाळले. दुसरीकडे कंपनीचे सचीन मुळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com