
औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद परिसरातील सातारा-देवळाईचा महापालिकेत समावेश होऊन सात वर्षांचा काळ लोटला. मात्र या भागात मूलभूत समंस्यांची साडेसाती कायम आहे. नुक्तीच नवनियुक्त प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांनी औरंगाबादेतील विसर्जन विहीरींकडे जाना-या मुख्य रस्त्यांवर पॅचवर्कसाठी तीन कोटी रूपयांची घोषणा केली. मात्र या पॅचवर्क कामालाही खाबुगिरी लागली आणि पॅचवर्क खड्ड्यात गेले.
सातारा - देवळाईत खड्डे तसेच
दुसरीकडे खंडोबाचे आराध्यदैवत असलेल्या ऐतिहासिक सातारा-देवळाईतील विसर्जन विहिरीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर गुडघ्याइतके खड्डे पडले आहेत. गणपती विसर्जन दोन दिवसावर येऊन ठेपले असताना महापालिका अधिकाऱ्यांना खड्डे बुजविण्याची शुद्ध राहिली नाही. परिणामी महापालिकेच्या डोळेझाक वृत्तीवर संतापलेल्या सातारा-देवळाई संघर्ष समितीचे सोमिनाथ शिराणे, अजय चोपडे, बंडू पारखे, श्रीधर दसपुते,राजू चिलघर,शेख फिरोज, सुरेश नन्नवरे, किशोर वसंतराव सोनवणे, सुनील आरते,कृष्णा शिराणे, सिताराम सलगर, भांडे यांच्या वतीने विसर्जन मार्गावरील खड्ड्यात गेलेल्या रस्त्यांवर बेशरमाचे झाडे लावून 'बेशरम' अधिकाऱ्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले, खड्ड्यांमुळे विसर्जन दिवशी ख॔ड्डयामुळे बाप्पाच्या मुर्तीची विटंबना झाल्यास महापालिकेतील प्रभाग अभियंता जबाबदार राहतील असा इशारा देत अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घ्यावी अन्यथा महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर तीव्रआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
सातारा-देवळाई की चिखलदरा
सुरूवातीला ग्रामपंचायतीतून महापालिकेत समावेश होऊनही आठ वर्षात पक्क्या रस्त्यांविना या भागातील नागरिकांनाचे हाल होत आहेत. महापालिकेकडून अव्वा का सव्वा कराच्या पावत्या पाठवल्या जातात. लोक कर देखील भरतात. मात्र विकासाच्या नावानं बोंबाबोंब होत आहे. या भागात चिखलामुळे खुप त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थी, चाकरमाने, फेरीवाले, आजारी रूग्ण सर्वांनाच चिखल तुडवीत जावे लागते.
तत्कालीन आयुक्तांच्या पाहणी नंतरही
यापुर्वी सातारा-देवळाईतील नागरिकांनी वेळोवेळी महापालिकेच्या पायऱ्या झिजवत आंदोलने, निवेदने दिली. त्यावर तत्कालीन आयुक्त डॉ. निपुण विनायक, आस्तिककुमार पाण्डेय, ओमप्रकाश बकोरिया, सुनिल केंद्रेकर यांनी सातारा वॉर्ड कार्यालयापासून लक्ष्मी कॉलनी, आमदार रोड, अलोकनगर, नाईकनगर, सारा सिद्धी, छत्रपतीनगरासह म्हाडा काॅलनी व इतर भागाची पदपाहणी केली. मात्र आजतागायत यातील एकही समस्या सुटली नाही.
नुसत्याच भेटी, अडचणी कायम
यानंतर नागरिकांनी पाठपुरावा केल्यावर प्रभाग अभियंता, वार्ड अधिकारी कायम या भागात भेटी देत नागरिकांच्या अडचणी जाणून घेतात. मात्र आमचे प्रश्न कधी संपणार? असा सवाल काही या भागातून संपत नाही.
काय म्हणतात नागरिक
महापालिकेत समावेश झाल्यानंतर विकास होईल, असे वाटले होते; मात्र आमचा भ्रमनिरास झाला आहे. ग्रामपंचायत असताना नागरिकांना मोफत पाणी मिळत होते; रस्त्यांची वेळोवेळी मलमपट्टी, दिवाबत्ती होत होती. पण आता पैसे भरूनही सुविधा मिळत नाहीत.
- सोमिनाथ शिराणे
नवीन योजना होईपर्यंत किमान तीन वर्ष आम्हाला पाण्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे टॅंकरने मोफत पाणीपुरवठा करावा, या भागात सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेची आहे.पण त्यांना जाणीव नाही.
- पदमसिंह राजपुत
पावसाळ्यात कार, दुचाकी रामभरोसे बीडबायपासवर पार्क करून दहा ते बारा किलोमीटर चिखल आणि खड्ड्यातून पायपीट करत घर गाठावे लागते. महापालिकेत समावेश करून शासनाने आमची फसगत केली. आता किती वर्ष विकासाची प्रतीक्षा करावी.
- ॲड. वैशाली शिवराज कडू पाटील