
औरंगाबाद (Aurangabad) : चिकलठाणा एमआयडीसीतील सिडको उड्डाणपुलालगत जालनारोड ते कलाग्राम या बाळासाहेब ठाकरे मार्गावर एमआयडीसी वितरण जलवाहिनीस आठदिवसांपासून गळती लागली होती. गत दोन महिन्यांपुर्वी एमआयडीसीने गळती शोधून काढली; दुरुस्ती देखील केली होती. परंतु दुरुस्तीचे काम केल्यावरही पुन्हा गळती लागल्याने रोज लाखो लिटर पाणी वाया जात होते. याबाबत स्थानिक नागरिकांसह एमआयडीसीतील उद्योजकांनी 'टेंडरनामा'कडे तक्रार केल्यानंतर वृत्त प्रकाशित करताच आज (ता. २९) पुन्हा जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामाला सुरवात करण्यात आली. त्यामुळे आता पून्हा एमआयडीसीतील पाणीपुरवठा किती दिवस बंद राहणार, याबाबत अधिकारी निश्चित सांगायला तयार नाहीत.
गेल्या आठ दिवसांपासून येथील १५० मिलिमीटर व्यासाच्या वितरण जलवाहिनीला गळती लागली होती. नेहमीप्रमाणे एमआयडीसीच्या पाणीपुरवठा विभागाने गळती दुरुस्तीचे काम करण्यास चालढकल चालविली होती. याभागातील उद्योजकांसह नागरिकांनी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र जोशी, कार्यकारी अभियंता आर. डी. गिरी, सहाय्यक अभियंता प्रशांत सरग यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र अधिकारी कानाडोळा करत होते.
याबाबत ‘टेंडरनामा’ने वृत्त प्रकाशित केले होते. एमआयडीसीच्या झोपेत असलेल्या कारभाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. शिवाय, लगतच्या रस्त्यांवर पाणी जमा होऊन त्रास सहन करावा लागत होता. ‘टेंडरनामा’च्या वृत्ताची दखल घेत आज एमआयडीसीच्या पाणीपुरवठा विभागाने सकाळीच गळती दुरुस्तीच्या कामाला सुरवात केली. दुरुस्तीला ४८ तासांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे दोन दिवस एमआयडीसीतील पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. दुरुस्तीनंतरच पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंता प्रशांत सरग यांनी दिली.
काय म्हणाले अधिकारी?
वाळुज ते चिकलठाणा पंपिंग स्टेशन पर्यंत प्रस्तावित ७०० मिलिमीटर व्यासाच्या नव्या जलवाहिनीचे संग्रामनगर उड्डाणपुलापर्यंत अर्थात १२ किलोमीटरपर्यंत काम झालेले आहे. ३० कोटीच्या या प्रकल्पासाठी नियुक्त रुद्राणी कन्सट्रक्शन काम करत आहे. त्यांना २६ सप्टेंबर २०२१ रोजी वर्कऑर्डर देण्यात आली आहे. १२ महिने कामाची मुदत आहे. ३० मार्च २०२३ पर्यंत हे काम होईल. यानंतर एमआयडीसीतील ३० वर्ष जुन्या डिस्ट्रिब्युशन जलवाहिन्यांचे काम देखील प्रस्तावित करत आहोत. या प्रकल्पासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- प्रशांत सरग, सहाय्यक अभियंता एमआयडीसी
यापुर्वी येथील जलवाहिनी दुरुस्तीसाठी वाहतूक बेटाचे विद्रूपीकरण करण्यात आले होते. आंदोलनाचा इशारा दिल्यावर एमआयडीसीने तब्बल दोन महिन्यानंतर वाहतूक बेटाची दुरूस्ती केली होती. यावेळी अशी चूक पून्हा अधिकाऱ्यांनी करू नये, अन्यथा शिवसेना स्टाईलने जाब विचारू. दुरुस्तीला आमचा विरोध नाही, पण दुरुस्तीनंतर कुणाला माती, मलब्याचा त्रास होणार नाही, याची दखल घेऊन तातडीने गट्टू बसविण्यात यावेत.
- मनोज बन्सीलाल गांगवे, माजी सभापती, शहर सुधार समिती