
औरंगाबाद (Aurangabad) : येत्या ऑक्टोंबर अखेरपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्र आणि त्यांनी जिंकलेले गडकिल्ले दाखवणारी सुंदर शिल्पचित्रांची गॅलरी क्रांती चौक येथे पर्यटक आणि नागरिकांना बघायला मिळणार आहे. या प्रकल्पाची मूळ संकल्पना स्मार्ट सिटीचे तत्कालीन महापालिका प्रशासक आस्तीककुमार पाण्डेय यांनीच मांडली असून, पुढे नवनियुक्त प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे सीईओ डाॅ. अभिजित चौधरी यांच्या पुढाकाराने अंतिम रूप साकारत आहे.
क्रांती चौक येथे औरंगाबाद महापालिकेकडून बसवण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचा सौंदर्यात भर घालण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी शिवसृष्टी प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाच्या विविध घटनांवर आणि त्यांनी जिंकलेले गडकिल्ले यांवर आधारित शिल्पचित्र (म्युरल्स) लावून क्रांती चौक उड्डाणपुलाच्या खाली सुंदर गॅलरी तयार करण्यात येत आहे. यासाठी सर्वात आधी कोल्हापूरचे इतिहास तज्ज्ञ इंद्रजीत सावंत यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीत अन्य इतिहासचे अभ्यासक यांचा समावेश करण्यात आला आहे. यांचाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाच्या ३८ विषय आणि इतर गडकिल्ले ठरवण्यात आले ज्यांच्यावर शिल्प तयार करण्यात आले.
या शिल्पांचे डिझाईन व मातीचे नमुने तयार करून कला संचालनालय, महाराष्ट्र सरकार यांची मान्यता घेण्यासाठी मुंबई स्थित जे. जे. कला महाविद्यालय येथे पाठवण्यात आले आहेत. यातील ११ शिल्पचित्रांची मान्यता मिळाली आहे आणि ते तयार झाले आहेत. असे प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा बक्षी यांनी टेंडरनामा प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. येत्या एक दीड महिन्यात बाकीचे शिल्पचीत्रांची मान्यता मिळाल्या नंतर ते पण तयार करून बसवले जातील. डॉ. अभिजित चौधरी यांचा नेतृत्वाखाली शिवसृष्टी प्रकल्प अंतर्गत बांधकाम ८० टक्के पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी जवळपास दीड कोटी रुपये एवढा खर्च करण्यात येत आहे. औरंगाबादचे शेख मुजीब उर रेहमान ह्या कंत्राटदाराला टेंडर प्रक्रिया मार्फत हे काम देण्यात आले आहे. स्मार्ट सिटीकडून प्रकल्प व्यवस्थापक म्हणून इम्रान खान बांधकामावर देखरेख करत आहेत. या संपूर्ण प्रकल्पाचे सल्लागार अजय ठाकूर असोसिएट्स हे आहेत. अहमदाबाद येथील रहाईनो कन्सल्टंट यांच्याकडून रोषणाई करण्यासाठी मार्गदर्शन घेण्यात येत आहे. रोषणाई बसवण्यासाठी टेंडर प्रक्रियानुसार मुंबईतील विन सोल्युशन्स यांना काम देण्यात आले आहे. यासाठी ९० लाख रूपये खर्च केला जात आहे.