जलवाहिनीवर यंदाही ४० लाखांचा चुराडा; ३ महिन्यांपूर्वीच केलेली...

Aurangabad
AurangabadTendernama

औरंगाबाद (Aurangabad) : चिकलठाणा एमआयडीसीतील एपीआय कॉर्नरजवळ तीन महिन्यांपूर्वी लाखो रूपये खर्च करून दुरूस्त केलेली एमआयडीसीची जलवाहिनी पुन्हा गत बुधवारी दुपारी फुटली. विशेष म्हणजे एमआयडीसीने या जलवाहिनीचा भुमिगत व्हॉल्व्हपासून डागडूजी केल्यानंतर देखील तो पुन्हा तुटल्यामुळे प्रचंड वेगाने पाणी बाहेर येत असल्याने हा परिसर जलमय झाला आहे. सदर जलवाहिनी जुनी झाल्याने त्या बदल्यात नव्या जलवाहिनेचे काम मात्र कासवगतीने सुरू आहे. इकडे मात्र जुन्या जलवाहिनीच्या दुरूस्तीवर दरवर्षी ४० लाखांचा चुराडा सुरू आहे.

Aurangabad
मुंबई पालिकेभोवती चौकशीचा फास, कॅगकडून विशेष ऑडिट होणार; शिवसेना..

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

तातडीने या जलवाहिनीची दुरूस्ती करणे आवश्यक असताना एमआयडी पाणीपुरवठा विभागाचे सहाय्यक अभियंता प्रशांत सरग, कार्यकारी अभियंता आर. डी. गिरी यांच्याकडून दुर्लक्ष होत आहे. परिणामी त्याचा पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. शिवाय साचलेल्या तळ्यामुळे जालना रस्त्यावर खड्डे पडत आहेत. यासंदर्भात प्रतिनिधीने सरग यांच्याशी संपर्क केला असता नेहमी प्रमाणे लाईनमन पाठवून जलवाहिनी दुरूस्त करणार, असे ते म्हणाले.

चिकलठाणा एमआयडीसी परिसरात ७०० एमएमची ही जलवाहिनी असून, यातून सिडको एन - वन, स्माॅल स्केल इंडस्ट्रीज, हाॅटेल्स आणि रूग्णालयांना पाणीपुरवठा केला जातो. गत बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास या जलवाहिनीवरील स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने असलेल्या एका वाहतूक बेटातील गट्ठूमधून पाणी बाहेर येत आहे. वाहनांच्या वजनाने व्हॉल्व्ह तुटल्याने जलवाहिनीमधील पाण्याचा वेग एवढा जास्त आहे की, एपीआय कॉर्नरपासून मुकुंदवाडी स्मशानापर्यंत पाणी वाहत असल्याने रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचत आहे. वाहनांच्या वेगाने पाणी नागरिकांच्या अंगावर उडत आहे. तीन महिन्यांपुर्वीच एमआयडीकडून या व्हॉल्व्हची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र सदर वितरण वाहिनी ही ३० वर्ष जुनी असल्याने ती जीर्ण झाली आहे. त्यामुळे वारंवार फुटत असल्याचे सहाय्यक अभियंता प्रशांत सरग यांनी सांगितले.

Aurangabad
औरंगाबाद मनपात प्रशासकांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी कोण?

नव्या जलवाहिनीचे काम कासवगतीने

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने चिकलठाणा औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र नवीन जलवाहिनीचा (फीडर लाइन) प्रस्ताव दिला होता. त्यास १० एप्रिल २०२० मध्ये मंजुरी मिळाली होती. वाल्मीगेट ते चिकलठाणा जलधारा हाऊसिंग सोसायटी पंप हाऊस या एकूण २२ किलोमीटरच्या नवीन पाईपलाइनसाठी ३० कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. याकामासाठी टेंडर देखील काढल्या गेल्या असून हे काम रुद्राणी कंस्ट्रक्शन्सला मिळाले आहे. दोन वर्षापूर्वीच कामाची स्थळपाहणी करून तांत्रिक तपासणी देखील करण्यात आली होती. प्रत्यक्षात अद्याप रुद्राणी कंस्ट्रक्शन या कंत्राटदाराकडून काम कासवगतीने सुरू आहे.

जीर्ण जलवाहिनीच्या दुरूस्तीवर लाखोची उधळपट्टी का?

चिकलठाणा एमआयडीसीला वाळूज एमआयडीसी पाणीपुरवठा केंद्रातून पाणी पुरविले जाते. ही जलवाहिनी ३० वर्षांपूर्वी टाकण्यात आलेली आहे. कालबाह्य झालेली ही जलवाहिनी अत्यंत जुनी व जीर्ण झाली आहे. वारंवार फुटत असल्याने अडचणी तर येतातच, शिवाय दरवर्षाला देखभाल दुरुस्तीसाठी टेंडर प्रसिद्ध करून ४० लाखाचा खर्च केला जातो. या अडचणी दूर करण्यासाठी ३० कोटींच्या नवीन जलवाहिनीचा प्रस्ताव दोन वर्षापूर्वीच मंजूर झाला आहे.

Aurangabad
मोठी बातमी: टेंडर भरताना काम प्रलंबित नसल्याच्या दाखल्याची अट रद्द

वाळूज ते चिकलठाणा औरंगाबादच्या मध्यवर्ती भागातून गेलेल्या या जलवाहिनीचे २२ किलोमीटरचे अंतर आहे. सद्यस्थितीत जुन्या जलवाहिनीचा वाळूज-पैठण लिंक रोड, वाल्मी-बीड बायपास-संग्रामनगर उड्डाणपूल-चाणक्यपुरी-क्रीडा संकुल-गजानन महाराज मंदिर-जालना रोड मार्गे चिकलठाणा वसाहत असा मार्ग आहे. मात्र, शहरात नव्याने झालेले सिमेंट रस्ते; जालना रस्त्याचे खोदकाम करण्याची वेळ येणार नाही यासाठी नवीन प्रस्तावात वाळूज-पैठण लिंक रोड-वाल्मी नाका-नाथ व्हॅली शाळा-सुधाकर नगर-मधुबन हॉटेल-बाळापूर फाटा ते मुकूंदवाडी जंक्शन आणि चिकलठाणा एमआयडीसी असा मार्ग प्रस्तावित आहे.

सध्याच्या जुनाट जलवाहिनीतून चिकलठाणा एमआयडीसीत रोज १५ एमएलडी पाणी आणले जाते. त्यातून काही रुग्णालये, सरकारी कार्यालये, हॉटेल यांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र अनेक ठिकाणी जलवाहिनीला गळती लागल्याने दुरूस्तीसाठी वारंवार पाणीपुरवठा बंद ठेवावा लागत असल्याने या जलवाहिनीवरील लाखो ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहेत. चिकलठाणा एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी ही ३० वर्ष जुनी असताना ती न बदलता एमआयडीसीने दुरूस्तीसाठी का खर्च करत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com