
औरंगाबाद (Aurangabad) : केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वप्नातील अमेरिकन दर्जाच्या राष्ट्रीय महामार्ग एनएच-५२ (सोलापुर-धुळे) या नॅशनल हायवेवर औरंगाबाद विभागांतर्गत पाच टोलनाके आहेत. त्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील पारगाव, बीड जिल्ह्यातील पाडळशिंगी, जालना जिल्ह्यातील भोकरवाडी-माळेवाडी तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील करोडी आणि हतनूर येथील समावेश आहे. या टोलनाक्यांवर नागरिकांकडून कोट्यावधीची वसुली केली जाते. मात्र, सुविधांचा अभाव असल्याचे टेंडरनामाच्या पाहणीत समोर आले आहे.
'नागरिकांना सुविधा म्हणून केवळ टेंडरमधील नियम व अटींची पूर्तता म्हणूनच कंत्राटदारांनी टोलनाक्याजवळ सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी केली. मात्र ते सद्य:स्थितीत प्रचंड घाणीच्या विळख्यात सापडले आहेत. दुसरीकडे प्राथमिक उपचार पेटी, रूग्णवाहिका आणि वाहनधारकांना कोणतीही मदत केली जात नाही. परिणामी नागरिक त्रस्त झाले आहेत. यासंदर्भात 'टेंडरनामा'कडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
हतनुरच्या स्कायलार्कला ३५ लाखाचा दंड मुजोरी कायम
प्रतिनिधीने यासंदर्भात औरंगाबाद येथील एनएचएआयच्या विभागीय कार्यालयातील क्षेत्रीय अभियंता आशिष देवतकर यांना विचारणा केली असता पारगाव, पाडळशिंगी, भोकरवाडी-माळेवाडी, करोडी येथील स्वच्छतागृहे व इतर सर्व सुविधा चांगल्या अवस्थेत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र हतनुरच्या टोलनाक्यावरील स्वच्छतागृहांची व इतर सुविधा नसल्याची तक्रार त्यांनी मान्य केली आहे. वर्षभरात त्याला तीन वेळा नोटीस बजावण्यात आल्याचे म्हणत, त्याला ३५ लाखाचा दंड आकारला असल्याचे देवतकर यांनी सांगितले.
नागरिकांवर आरोप
याबाबत त्यांनी काही नागरिकांना देखील दोष दिला आहे. लोकही स्वच्छतागृहातील साहित्य चोरून नेत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारतात, अगदी महामार्गावरील बसस्थांब्यांचे फायबर शेडदेखील चोरीला जात असल्याचा धक्कादायक प्रकार सांगत त्यांनी कंत्राटदाराचे समर्थन केले आहे.
'टेंडरनामा'चा ऑनदस्पाॅट पंचनामा
प्राप्त तक्रारीनुसार 'टेंडरनामा' प्रतिनिधीने औरंगाबाद जिल्ह्यातील व कन्नड तालुक्यातील सोलापुर-धुळे या नॅशनल हायवेवरील हतनुर येथील टोलनाक्याची शनिवारी पाहणी केली. त्यात महिला व पुरूष शाैचालयाजवळ मोठ्या प्रमाणात कचरा कचरा पडून असलेला आढळला. प्रवाशी महिला व पुरूष या घाणीतून मार्ग काढत शौचालयात मोठ्या कसरतीने जाताना दिसले. इतर सुविधांची देखील वाणवा दिसली.
यांनी बांधले, हे जबाबदार...
पारगाव, पाडळशिंगी, भोकरवाडी-माळेवाडी येथील टोलनाक्याजवळ स्वच्छतागृहे रस्ते बांधकाम बीओटी तत्वावर असल्याने कंत्राटदार आयआरबी कंपनीने बांधले आहेत. करोडी येथील स्वच्छतागृहे एलएनटी आणि हतनुर येथील स्वच्छतागृहे डीबीएल कंपनीने बांधली आहेत. यातील पारगाव, पाडळशिंगी आणि भोकरवाडी-माळीवाडा येथील स्वच्छतागृहांची देखभाल करण्याची जबाबदारी आयआरबी कंपनीची आहे. मात्र करोडी आणि हतनुर येथील स्वच्छतागृहांची जबाबदारी 'एनएचएआय'कडे आहे.
मुख्यालयातून नेमला ठेकेदार
करोडी व हतनुर येथील टोल कलेक्शन व नागरिकांना सुविधा देण्यासाठी एनएचएआयच्या मुख्यालयातून खुले टेंडर मागविण्यात आले होते. त्यात डीबीएल व एलएनटी ऐवजी औरंगाबाद ते करोडी, करोडी ते हतनुर रस्त्याचा व टोलप्लाझा उभारणीचा खर्च 'एनएचएआयने' केला आहे. मात्र रस्त्याबरोबरच फक्त चार वर्षा बांधकामाच्या देखभाल-दुरूस्तीच्या अटीवर हतनुरच्या टोलप्लाझाची उभारणी डीबीएल कंपनीने. करोडी येथील टोलप्लाझाची उभारणी एलएनटीने केली असली तरी टोल कलेक्शन करणे व नागरिकांना सेवा सुविधा देण्यासाठी एनएचएआयच्या वतीने खुले टेंडर काढुन त्यात हरियानाच्या स्कायलार्क कंपनीला कंत्राट देण्यात आला. दुसरीकडे अशाच पद्धतीचा कंत्राट करोडी टोल प्लाझासाठी हैद्राबादच्या व्ही. विद्यासागर रेड्डी यांना देण्यात आला. यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी एनएचएआयचे प्रकल्प संचालक तसेच संबंधित क्षेत्रीय व्यवस्थापकांवर टाकण्यात आली.
प्रशासनाचे दुर्लक्ष
पारगाव, पाडळशिंगी आणि भोकरवाडी-माळेवाडी करोडी व हतनुर येथील स्वच्छतागृहात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असते, कधीही स्वच्छता ठेवण्यात येत नाही. परिणामी एकही दिवस या शाैचालयाचा वापर झाला नाही. त्यामुळे हे शाैचालय निकामी ठरले आहे. या ठिकाणी पाण्याची साेय नाही. शाैचालयातील नळाच्या तोट्या देखील गायब झाल्या आहेत. शिवाय येथील दरवाजे खिडक्यांना कडीकोंडयांचा देखील अभाव आहे. या सार्वजनिक शाैचालयांची दुरुस्ती करून स्वच्छता करण्यात यावी. अशी मागणी राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे संजय जाधव पाटील यांनी केली आहे.
असे आहे कोट्यावधीचे उत्पन्न
● हतनुर टील प्लाझावर टोल कलेक्शन करणाऱ्या स्कायलार्क या कंपनीला टेंडरमधील अटी - शर्तीनुसार प्रत्येक आठवड्याला एनएचएआयच्या खाती एक कोटी ७ लाख ६६ हजार जमा करावे लागतात.
● करोडी येथील कंत्राटदार व्ही. विद्यासागर रेड्डी या कंपनीला १० लाख १३ हजार ७९८ रूपये दर आठवड्याला एनएचएआयच्या खाती जमा करावे लागतात.
या दिवशी सुरू झाले होते टोलनाके
● पारगाव , पाडळशिंगी आणि भोकरवाडी - माळेवाडी हे टोलनाके १७ मार्च २०१९ रोजी सुरू झालेत.
● करोडी टोलनाका २४ डिसेंबर २०२१ रोजी सुरू झाला
● हतनुर येथील टोलनाका १७ मार्च २०२१ रोजी सुरू झाला
लोकांच्या पैशातून रस्ते ...
सोलापुर - धुळे या नॅशनल हायवेवरील लोकांनी रस्त्यापोटी इतका निधी दिला
● पारगाव : १०६ कोटी ५१ लाख ७६ हजार ८५६ रूपये
● पाडळशिंगी : १७५ कोटी १३ लाख ७९ हजार २६० रूपये
● भोकरवाडी - माळेवाडी : १२९ कोटी ६६ लाख १८ हजार ५५४ रूपये
● करोडी : २२ कोटी ६० लाख ५ हजार ६५० रूपये
● हतनुर : ६५ कोटी ५९ लाख ६८ हजार ६३४ रूपये