
औरंगाबाद (Aurangabad) : 'टेंडरनामा'च्या वृत्तमालिकेनंतर शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्या प्रयत्नांना यश आले असून, केंद्र व राज्य सरकारच्या मिळालेल्या निधीतून साडेचौदा कोटी एवढ्या रकमेतून औरंगाबादेतील २६ किलोमीटर लांबीच्या २४ दुभाजकांचे रूपडे पालटवण्यात येत आहे. औरंगाबाद महापालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी तत्कालीन महापालिका प्रशासक आस्तीककुमार पाण्डेय यांच्याकडे दुभाजक बांधकामाचा प्रस्ताव ठेवला होता. ज्या ठिकाणी दुभाजक नाहीत, ज्या ठिकाणी कमी उंचीचे दुभाजक आहेत, अशा ठिकाणी दुभाजक बांधकामाच्या निर्णयाला पांण्डेय यांनी तातडीने मंजुरी दिली होती.
त्यानुसार महापालिकेने नुकतेच सेव्हनहील ते गजानन मंदिर ते सुतगिरणी चौक ते शिवाजीनगर ते एकता चौक या दुभाजकाचे पहिल्या टप्प्यात काम सुरू केले आहे. गेल्या कित्येक वर्षापासून दुभाजकांचे प्रलंबित काम महापालिकेने हाती घेतल्याने औरंगाबादकर समाधान व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे बांधकामात जुने झाड तोडले तर ठेकेदाराला पाच झाडे लावण्याची तंबी देण्यात आली आहे. दुभाजकांचे काम झाल्यावर त्यात काळी माती टाकणे, वाहतूक नियमाप्रमाणे रंगरंगोटी करण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे. यानंतर उद्यान विभागाकडून दुभाजकांचे विविध झाडाफुलांनी सुशोभिकण करण्यात येणार असल्याने औरंगाबादच्या सौंदर्यात भर पडणार आहे.
शहरातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात दुभाजक महत्त्वाची भूमिका बजावतात. कोणीही रस्ता सहज ओलांडू नये, इतक्या उंचीचे दुभाजक शहरात असणे आवश्यक आहे. महापालिकेने गेल्या २० वर्षांत अनेक रस्त्यांचे डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण करून रस्त्यांची उंची वाढवली. त्यानंतर सुरक्षित वाहतुकीसाठी रस्त्यावर दुभाजक बांधणे आवश्यक असताना, मात्र यासाठी सातत्याने निधी नसल्याचे कारण दाखवले. परिणामी दुभाजकांच्या उंचीकडे लक्ष नाही. दुभाजकांच्या दुरवस्थेमुळे अनेक वाहनचालक त्यांना धडकून जखमी झाले. अनेकांचा बळी गेला, तर अनेक रस्त्यांनी दुभाजक पाहिलेलेच नव्हते.
टेंडरनामा वृत्तमालिकेचा परिणाम
'टेंडरनामा'ने शहरातील दुभाजकांच्या बकालपणावर प्रकाश टाकला होता. त्यानंतर शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. पानझडे यांनी नव्याने झालेल्या सिमेंट आणि डांबरी रस्त्यांची पाहणी केली. प्रभाग अभियंत्यामार्फत त्यांचे सर्वेक्षण केले. त्यानंतर दुभाजकांचा सविस्तर प्रकल्प विकास आराखडा तत्कालीन महापालिका आयुक्त आस्तीककुमार पाण्डेय यांच्याकडे सादर केला होता. पाण्डेय यांनी तातडीने अंदाजपत्रक तयार करून टेंडर प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले होते.
पाण्डेय यांच्या आदेशानंतर शहरातील २४ रस्त्यांवर दुभाजक बांधणीसाठी २० कोटीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. त्यानंतर टेंडर प्रक्रियेत साडेबारा टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दर्शविणाऱ्या खंडू पाटील यांच्या के. एस. कन्सट्रक्शन कंपनीला हे काम देण्यात आले आहे. जागतिक बँक प्रकल्पातील सेवा निवृत्त अभियंता एस. एस. म्हस्के व अभिजित म्हस्के यांच्यावर बांधकामाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ठेकेदाराला सैन्यदलातील सेवानिवृत्त अभियंता भगवान तांबडे आणि बाळु राठोड हे बांधकाम साहित्य व मजुरांचा पुरवठा करत आहेत. त्यामुळे साडेचौदा कोटीतून शहरातील २६ किलोमीटरच्या २४ दुभाजकांचे रूपडे लवकरच पालटणार आहे.
असा होईल फायदा
अत्यंत कमी उंचीचे दुभाजक त्यात बहुतांश रस्ते दुभाजक विनाच असल्याने त्यामुळे नागरिक बिनदिक्कतपणे रस्ता ओलांडत असत. त्यामुळे दररोज कुठेना कुठे छोटे-मोठे अपघात घडत असतत. रात्रीच्या वेळी अपघाताचे प्रमाण जास्त होत होते. विशेषत: आधीच दशावतार झालेल्या दुभाजकात अनेक दुभाजकांवर बेजबाबदार नागरिक कचरा टाकत होते. काही दुभाजकांचे कठडे तोडुन व्यावसायिकांनी व्यापारी प्रतिष्ठानांसाठी तर काही नागरिकांनी कॉलनी, वसाहतीच्या सोयीसाठी दुभाजकांवर टिकावाचे घाव घातले होते. आता या प्रकाराला आळा बसून वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल. दुभाजक बांधकामाचे काम हाती घेतल्याने वाहतूक पोलिसांची अवघड डोकेदुखी कमी होईल.