
औरंगाबाद (Aurangabad) : शहरातील वार्ड क्रमांक १०३ वेदांतनगर प्रभागातील कोकणवाडी-भगीरथनगर जलसंपदा विभागातील बड्या अधिकाऱ्यांच्या वसाहत आणि एका बड्या शिक्षणमहर्षीच्या शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत असताना आमदार-खासदारांनी घाईघाईत लोकार्पण सोहळा पार पाडला. यात दोन ठिकाणी मध्येच काम अर्धवट सोडुन देण्यात आले आहे. ते पुर्ण करण्याचे आश्वासन देत नागरिकांची बोळवण करण्यात आली. मात्र नंतर आमदार-खासदारांना दिलेल्या आश्वासनाचा विसर पडल्याचे दिसून येत आहे.
कोकणवाडी ते भगीरथ नगरकडे जाणाऱ्या रस्त्याचे दोन तुकड्यात काँक्रिटीकरण करण्यात आले. यात पहिला पाचशे मीटरचा तुकडा अर्थात कोकणवाडी चौक ते वखार महामंडळाचे गेट हा रस्ता खासदार राजकुमार धुत यांच्या निधीतून करण्यात आला. यासाठी १० लाख रूपये खर्च केला गेला. याच रस्त्यापुढील दुसरा तुकडा वखार महामंडळाच्या गेटपुढे ५० मीटर लांबीचा पॅच मध्येच अर्धवट सोडुन शिक्षणमहर्षी मधुकर मुळे यांच्या देगगिरी ग्लोबल स्कुलपर्यंत आमदार सतीष चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून करण्यात आला आहे. यासाठी १० लाख रूपये खर्च करण्यात आला आहे. पुढे देवगिरी ग्लोबल स्कुल ते जलसंपदा काॅलनीपर्यंत रस्ता अर्धवट स्थितीत तसाच सोडून देण्यात आला आहे.
रस्ते बांधकामाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपवण्यात आली होती. सुशिक्षित बेरोजगार मजुर संस्थेच्या परवान्यावर आमदार-खासदारांच्याच कार्यकर्त्यांना या कामाचा ठेका देण्यात आला होता. यात खासदार धूत यांच्या निधीतील काम शिवसेना शहर उपप्रमुख राजु राजपुत यांना देण्यात आले होते. तर आमदार चव्हाण यांच्या निधीतील काम माने कन्सट्रक्शनला देण्यात आले होते. खासदार राजकुमार धुत यांच्या निधीतील रस्त्याचे काम २०१७ मध्ये करण्यात आले होते. आमदार सतीष चव्हाण यांच्यानिधीतील काम २०२१-२२ या आर्थिक वर्षात करण्यात आले. मात्र सहाच महिन्यात या रस्त्याचे तीन तेरा वाजले.
नेमकी काय झाली अडचण
कोकणवाडी रेणूकामाता मंदिर ते भगीरथ नगर दरम्यान वखार महामंडळाच्या गेटसमोरच अर्धवट पॅच सोडून आमदार सतीष चव्हाण यांच्या निधीतील काम सुरू केल्याने व पुढे देवगिरी ग्लोबल स्कुल ते जलसंपदा काॅलनीकडे जाणाऱ्या ३०० मीटर लांबीचा पॅच मध्येच अर्धवट सोडल्याने येथील खड्डेमय आणि खोलगट रस्त्यावर पावसाळ्यात कंबरेएवढे पाणी साचते. पावसाची सुरुवात होताच या परिसरातील नागरिकांना चिखलाची सम॔स्या निर्माण होते.
आमदार, खासदारांचे 'हात' वर
यातून सुटका होण्यासाठी या रस्त्याचे अर्धवट काम पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी भगीरथ नगर येथील नागरिक करीत आहेत. गेल्या वर्षी अतिवृष्टीत या अर्धवट रस्त्यामुळे नागरिकांच्या घरात पावसाळ्याचे पाणी शिरल्याने मनसेचे शहराध्यक्ष गजेन शाम गौडा (पाटील) यांनी नागरिकांसह रस्त्याच्या कामासाठी आंदोलन देखील केले. त्यावर माजी महापौर विकास जैन यांनी आमदार सतीष चव्हाण यांच्या निधीतील उखडलेल्या रस्त्यावर दोन रेडिमिक्स सिमेंट काँक्रिटच्या गाड्या आणत थातूरमातूर लिपापोती करत 'ठेकेदाराची' खाबुगिरीवर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या लिपापोतीने देखील फार दिवस तग धरला नाही. संतापलेल्या नागरिकांना गत अतिवृष्टीत पावसाळ्यानंतर रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, दुसरा पावसाळा आल्यानंतरही अद्याप या रस्त्याचे काम झाले नसून तो रस्ता आजही अर्धवट अवस्थेत आहे.
माजी महापौर घोडेलेंचे आदेश पाण्यात
कोकणवाडी चौकाकडुन थेट भगीरथनगरकडे येणारा हा भाग उतारावर असल्याने पावसाळ्यात दरवर्षी येथे पाणी साचते. स्टेशन रस्त्याकडूप वाहून येणारे पाणी, तसेच परिसरातील नाल्यावर अनधिकृत बांधकाम झाल्याने नाल्याचा प्रवास बदलून ते पाणी रस्त्यावर येते आणि यात भर पडते. थोडासा पाऊस झाला तरी रस्त्यावर पाणी साचते. पाणी साचल्याने रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद होते. या त्रासाला नागरिक कमालीचे त्रासले असून गेल्या वर्षी नागरिकांनी संतापून उग्र आंदोलन केले होते. माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी देखील या रस्त्याची पाहणी करून रस्त्याचे काम लवकर करावे, अशा सूचना पालिका अधिकाऱ्यांना केल्या होत्या. त्यावर पावसाळ्यानंतर हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन पालिका अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र पावसाळा उलटून दुसरा पावसाळा आला तरी येथील रस्त्याचे काम हाती घेण्यात आलेले नाही.
निकृष्ट आणि अर्धवट काम
केवळ आहे त्या जुन्या डांबरी रस्त्यावर जेसीबीने स्क्रॅच करून रेडिमिक्स काॅक्रीटचे थर टाकून रस्त्याची उंची ओबडधोबड उंची वाढवण्यात आली. मध्येच काम सोडून देण्यात आले आहे. रस्त्याचे शोल्डर फिलिंग केले नाही. परिणामी खटकी पडल्याने वाहनांची पार्किंग रस्त्यावर केली जात आहे. भगिरथनगरातील लोकांनीच स्वखर्चातून शोल्डरमध्ये काॅक्रीट करावे लागले. सां.बां. प्रशासन आणि महापालिका प्रशासन मोठ्या अपघाताची वाट पाहात आहे का? याच मार्गावर देवगिरी ग्लोबल स्कुलची वाहने धावतात. लाखो रूपये खर्च करून झालेल्या कामावर एकही नागरिक खुश नाही. रस्त्याच्या कामासाठी येथील रहिवासी सातत्याने ओरड करीत आहेत. मात्र, पालिका व सां.बां. प्रशासनास अद्यापही जाग येत नाही. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत केवळ पाहिला जात आहे. आमदार - खासदार तोंड दाखवत नाहीत.
- गजेन गौडा पाटील, मनसे शहराध्यक्ष