
औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबादेतील सिडको येथील जळगाव टी पाॅईंट उड्डाणपुलाच्या धावपट्टी आणि जोड रस्त्यांचा सरफेस मुसळधार पावसाने उखडल्यानंतर खडी रस्त्यांवर पसरली होती. मात्र रस्त्यांची स्वच्छता करण्यास जेएमसी प्रोजेक्ट (इंडिया) प्रा. लि. हा मुंबईचा ठेकेदार आणि एमएसआरडीच्या अधिकाऱ्यांकडून निष्काळजीपणा केला जात होता. परिणामी रस्त्यांवर पसरलेल्या खडीमुळे वाहनचालक आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता.
याबाबत 'टेंडरनामा'ने ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा उघड करताच त्याची दखल घेत ठेकेदाराने उड्डाणपुलावरील धावपट्टी आणि जोड रस्त्यांवर स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे औरंगाबादकरांनी समाधान व्यक्त केले आहे. आता पावसाळ्यानंतर रस्ते देखील चकाचक होणार असल्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सिडकोतील औरंगाबाद - जालना राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी व अपघाताची मालिका खंडित करण्यासाठी सरकारी तिजोरीतून ५६ कोटी २५ लाख रुपये खर्च करत जळगाव टी पाॅईंट येथे उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली. राज्य सरकारच्या नगर विकास विभागाकडून महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळावर (MSRDC) संपूर्ण बांधकामाची जबाबदारी टाकण्यात आली होती. टेंडरमध्ये यशस्वी झालेल्या मुंबईतील रंजन मिश्रा या ठेकेदाराच्या मे. जेएमसी प्रोजेक्ट (इंडिया) प्रा. लि. कंपनीला १३ फेब्रुवारी २०१४ रोजी वर्क ऑर्डर देण्यात आली होती. २० जून २०१६ मध्ये त्याने प्रकल्प पूर्ण केला होता. त्यानंतर ९ वर्षे पुलाच्या देखभाल दुरुस्तीची त्याच्याकडे जबाबदारी होती.
मात्र, रस्त्याचा दोषनिवारण कालावधी बाकी असताना पुलाच्या देखभाल - दुरूस्तीकडे ठेकेदाराकडून कानाडोळा करण्यात येत होता. पावसाळ्याआधी खड्ड्यांची लिपापोती तर , सोडाच पण पावसाळ्यात उखडलेल्या सरफेसची खडी सफाईकडे देखील कंत्राटदाराकडून दुर्लक्ष केले जात होते. आधीच खड्डेमय रस्ते त्यात, खडी पसरल्याने रस्त्यावर वाहतूककोंडी होत होती. त्यात पुलावरील सांडपाण्याचे नादुरूस्त पाईपामुळे पुलावर आणि रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालकांना या सर्व समस्यांचा सामना करावा लागत होता.
याबाबत 'टेंडरनामा'ने बातमी प्रसिद्ध करताच, एमएसआरडीसीचे मुख्य अभियंता बी. पी. साळुंखे यांनी अधिकाऱ्यांना जागे करत जेएमसी प्रोजेक्ट (इंडिया) प्रा. लि. या ठेकेदाराला नोटीस पाठल्यानंतर. तात्काळ कंत्राटदारामार्फत रस्त्यावरील खडी उचलण्यासाठी मनुष्यबळ लावण्यात आले. त्यामुळे उड्डाणपूल व पुलाखालचे जोड रस्ते स्वच्छ करण्यात आल्याने स्थानिकांनीही सुटकेचा निश्वास सोडला. आता पावसाळ्यानंतर पुलावरचे आणि जोड रस्ते चकाचक होणार असल्याचे अधिकारी आणि ठेकेदाराने सांगितले.