
औरंगाबाद (Aurangabad) : महावीर चौक ते नगरनाका रूंदीकरणाबाबत टेंडरनामाने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर येथील वाहतुकीला अडथळा ठरणारी १३ अतिक्रमणे महापालिका आयुक्त आस्तीककुमार पाण्डेय यांच्या आदेशाने अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण हटाव पथकाने बुधवारी हटवली. त्यामुळे आता मुख्य चौकालगत असणारा उत्तरेकडील १५ फूट रस्ता वाहतूकीस मोकळा झाला आहे.
२०१३ मध्ये नगरनाका ते गोलवाडी रस्त्याचे चौपदरीकरणासाठी संरक्षण खात्याकडून जागा ताब्यात घेण्यास यश आले आणि नगरनाका ते गोलवाडी रस्त्याचे पुढे चौपदरीकरण करण्यात आले. यामुळे या मार्गावरील नेहमी होत असलेली वाहतूक काेंडी फुटल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला. मात्र, दरम्यान महावीर चौक ते नगरनाका रस्त्याचे चौपदरीकरण न करता कर्णपुरा ते लोखंडीपुलापर्यंत बाह्यवळण मार्ग करण्यात आला. याचवेळी तत्कालीन जिल्हाधिकारी विक्रमकुमार, तत्कालीन महापालिका आयुक्त डाॅ. पुरूषोत्तम भापकर तसेच तत्कालीन विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवताना महावीर चौक ते नगरनाका रूंदीकरणाबाबत उल्लेख न केल्याने या एक किमी मार्गावर वाहतूक कोंडी कायम राहिली. याबाबत टेंडरनानाने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. त्यात पोलिस, विभागीय तसेच महापालिका प्रशासकांना देखील येथील कोंडी फोडण्याबाबत आवाहन केले होते.
प्रशासकांचे आदेश धुडकावले, अतिरिक्त प्रशासकांना विसर
दरम्यान, महावीर चौकातील कोंडी फोडण्याबाबत महापालिका प्रशासकांकडे दोन महिन्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या. त्याची दखल घेत महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय, अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांनी दोन महिन्यांपूर्वी पाहणी करून अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले हाेते. त्यानुसार येथील व्यापारी, नागरिकांना नोटिसा देखील बजावल्या होत्या. पण, या दुकानदारांनी प्रशासकांचा आदेश धुडकावला. विशेष म्हणजे अतिरिक्त प्रशासक रविंद्र निकम यांना देखील कारवाईचा विसर पडला. परिणामी महावीर चौकात तासनतास वाहतूक काेंडी हाेऊन छाेटे-मोठे अपघात होत होते.
टेंडरनामाच्या वृत्ताने प्रशासकांना झाली आठवण
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच महावीर चौक ते नगरनाका रस्ता रूंदीकरणाबाबत टेंडरनामाने सचित्र वृत्त प्रकाशित केले होते. यासंदर्भात महापालिका प्रशासकांकडे देखील पाठपुरावा केला होता. दरम्यान प्रशासकांना या ठिकाणी केलेली पाहणी आणि दिलेल्या आदेशाची आठवण झाली. त्यांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घातले. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मंगळवारी रस्त्यापासून पंधरा फुटांपर्यंत १३ दुकाने भुईसपाट केली. परिणामी आता १५ फुटाचा रस्ता मोकळा झाल्याने आता पुणे, अहमदनगर, धुळे, वाळुज-पंढरपूर, युपी आणि एमपीकडुन तसेच खुलताबादवरून येणाऱ्या डाव्या बाजूने बसस्थानकाकडे हा रस्ता मोकळा झाल्याने एसटी बसेस रस्त्यावर थांबा न घेता या जागेचा वापर करतील आणि परिणामी वाहतूक कोंडी थांबेल.