.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
यवतमाळ (Yavatmal) : वाठोडा गावातील ग्रामस्थांनी आमच्या गावाजवळील पूल दुसरीकडे नेल्याचा आरोप केला आहे. राळेगाव तालुक्यातील वाठोडा या गावातील सरई वाठोडा रस्त्यावर असलेला पूल दुसरीकडे नेल्यामुळे या गावाचा संपर्क पावसामुळे तुटतो, असा ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
मागील चार दिवसांपासून सतत धार पाऊस सुरू असल्याने गाव खेड्यात पूरजन्य स्थिती झाली आहे. तालुक्यातील वाठोडा या गावातून राळेगावकडे येताना सरई मार्गे प्रवास करावा लागतो. वाठोडा गावापासून एक किलोमीटर अंतरावर एक रपटा आहे, तो रपटा छोटा असल्यामुळे त्यावरून नेहमी पाणी जात असते. या पुलावरून पाणी असताना रस्ता ओलांडणे धोक्याचे असते. अशा वेळी वाठोडा ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे.
गेल्या चार दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे येथील गावाचा काही कालावधी करता संपर्क तुटला होता. रात्री कोणाची तब्येत खराब झाली, तर ग्रामस्थ अडचणीत पडतात. गावातून बरेच विद्यार्थी सावनेर राळेगाव येथे शिक्षण घेण्यासाठी जाणे येणे करीत असतात. या गावात एसटी ठरलेल्या वेळेत चालते. परंतु पुलावरून पाणी असताना काही दिवस एसटीदेखील बंद होती. येथील मंजूर झालेला पूल दुसरीकडे नेल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
या रस्त्यावर मोठा पूल असणे गरजेचे आहे. याकरिता पुलाचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी सरपंच गजिता जनार्धन मरसकोल्हे, उपसरपंच मंगेश झोटिंग सोबत अनेक ग्रामस्थांनी केली आहे.
मंजूर पूल दुसरीकडे नेला का, असे उपविभाग अभियंता अभिषेक बोरगमवार यांना ग्रामस्थांनी जाब विचारला. त्यांनी कोणताही पूल कुठेही नेला नाही, असे स्पष्ट केले. येत्या बजेटमध्ये या रस्त्यावर 75 फूट लांबीचा मोठा पूल मंजूर झाला आहे. दिवाळीपासून येथील पुलाचे काम सुरू होईल. सध्या पावसाळा असल्याने पुलाचे काम सुरू करता येत नाही, असे त्यांनी स्पष्ट उत्तर दिले.