यवतमाळ (Yavatmal) : ग्रामीण भागात विकासकामे झपाट्याने व्हावीत, मजुरांच्या हाताला काम मिळावे, यासाठी आर्णी तालुक्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची कामे करण्यात आली. या कामांचे मागील तीन वर्षांपासून 13 कोटी रुपये अडकले आहेत. 145 कुशल कामांचा निधी अजूनही मिळाला नाही. परिणामी आर्णी तालुक्यात विकासकामांना ब्रेक लागला आहे.
ग्रामीण मजुरांना शंभर दिवस मजुरी उपलब्ध करून देण्यात आली. यानुषंगाने तालुक्यातील प्रत्येक गावात वैयक्तिक व सार्वजनिक विकासकामे पूर्ण झाली. मजुरांना त्यांच्या मजुरीचे पैसे (अकुशल निधी) मिळाले. परंतु सार्वजनिक व वैयक्तिक कामासाठी लागणारे सिमेंट, रेती, गिट्टी, गज, मुरूम, टँकर, ट्रॅक्टर, विटा, सेंट्रिंग, पाणी या वस्तूंची कुशल देयके मागील तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत.
बांधकाम साहित्याचा पुरवठा करणाऱ्यांनी आता प्रलंबित देयकांसाठी जिल्हा परिषद, ग्रामपंचायती आणि ही कामे करणाऱ्या व्यक्तींकडे तगादा लावणे सुरू केले आहे. काही पुरवठादारांनी थकीत रकमेवर व्याज लावणे सुरू केले आहे.
यानंतरही संबंधित रकमेची देयके काढली जात नाहीत. 2021, 22, 23, 24 या वर्षात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मागेल त्याला वैयक्तिक काम आणि गावातील सर्वांगीण विकासाची कामे करण्यात आली. केलेल्या कामाचे मूल्यांकन संबंधित यंत्रणेकडून करण्यात आले. तसेच जिल्हास्तरावरील निवड समितीकडून तपासणी करण्यात आली.
झालेल्या कामाची देयके ऑनलाइन सादर करण्यात आली. परंतु, रक्कम प्राप्त झालेली नाही. शिवाय सन 2023- 24 मध्ये झालेल्या कामाचे बिल यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित आहे.
गावाच्या विकासात महत्त्वाचे योगदान असलेल्या या योजनेच्या कामात निधी दिला जात नसल्याने खोडा निर्माण झाला आहे. या योजनेतून वैयक्तिक तसेच सार्वजनिक कामे मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहेत. परंतु, मागील तीन वर्षापासून सार्वजनिक कामावर निधी उपलब्ध होत नसल्याने तालुक्यातील विविध विकासकामे बंद आहेत, परिणामी तालुक्यात कामे थांबली आहेत. मजुरांच्या हाताला कामे नाहीत. कामे सुरू होण्यासाठी प्रलंबित देयके मार्गी लावण्याची गरज आहे.
मनरेगा योजनेंतर्गत आर्णी तालुक्यात झालेल्या विविध कामांची कुशल देयके बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित आहेत. या कामांविषयीची माहिती घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. या देयकांची रक्कम मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे, अशी माहिती आर्णीचे तहसीलदार वैशाख वाघ यांनी दिली.