
नागपूर (Nagpur) : नागपूर शहरात सध्या सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याची स्पर्धा लागली आहे. विकासाच्या नावाखाली नेत्यांच्या अट्टाहासामुळे शहर पाण्यात बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे. दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे याचा प्रत्यय आल्याने महापालिका प्रशासनाला आता तरी जागे व्हावे लागणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खड्डेमुक्त नागपूर करण्यासाठी सुरवातीला वर्दळीचे रस्ते काँक्रिटचे करण्याचे ठरविले होते. यावर ३०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्यानंतर एकएक करून जवळपास सर्वच रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. तीन टप्प्यांमध्ये ही योजना आखली आहे. दोन टप्पे आतापर्यंत पूर्ण झाले आहेत. तिसऱ्या टप्प्यांमध्ये काही रस्ते काँक्रिटचे केले जात आहेत.
रस्त्यांचे काँक्रिटीकरण करताना कंत्राटदार कुठलाच विचार करीत नाही. जुने रस्ते खोदकाम करण्यासाठी मोठा खर्च येते. बांधकामाच्या साहित्याची विल्हेवाट लावावी लागते. यात मोठा खर्च होतो. तो वाचवण्यासाठी आहे त्याच रस्त्यांवर सिमेंटीकरण केले जात आहे. त्यामुळे जवळपास सर्वच रस्त्यांची उंची अर्ध्या फुटाने वाढली आहे. घरे खाली गेली आहेत. तसेच यापूर्वी अनेक रस्त्यांच्या शेजारी असलेल्या पावसाळी नाल्या बुजवण्यात आल्या आहेत. त्यामुळे वापसाचे पाणी थेट घरांमध्ये शिरते. ही समस्या अलीकडेच निर्माण झाली आहे. पाणी घरात शिरल्यानंतर अनेकांनी रस्त्यावरचे डिव्हायडर फोडून पाण्याचा मार्ग मोकळा करून दिला.
आता सिमेंटरोडला मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागला आहे. रस्ते चांगले हवे मात्र ते घरच उध्वस्थ करणारे नकोत, अशी मागणी होऊ लागली आहे. सिमेंटरोडचे कंत्राट देताना महापालिकेने आता त्याची उंची वाढणार नाही, अशी अट टाकणे गरजेचे आहे. जुन्या रस्त्याचे खोदकाम केल्याशिवाय बांधकामाला मंजुरी देऊ नये, अशी मागणी केली जात आहे.