भंडारा (Bhandara) : भंडारा - तुमसर - बालाघाट या राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करण्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून करण्यात आली. परंतु, अजूनपर्यंत डीपीआर संबंधित विभागाला सादर झाला नाही, अशी माहिती असून, या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे दर दिवशी येथे अपघाताची भीती निर्माण झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा अनुभव या महामार्गावरून जाताना वाहतूकदारांना येतो. एकूणच काय तो महामार्ग, काय ते खड्डे, काय तो धोका आणि काय ते प्रशासन असे म्हणायची नागरिकांवर वेळ आली आहे.
सुरक्षित रस्ते असावेत, अशी हमी शासनाकडून दिली जाते. राष्ट्रीय महामार्गाचे जाळे निर्माण केले जात आहे. केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भंडारा तुमसर- बालाघाट या राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा सुमारे दोन वर्षांपुर्वी घोषित केला, त्याचे स्वागत करण्यात आले. राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात लवकरच होईल, तशी घोषणा त्यावेळी मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. परंतु, अजूनपर्यंत या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही. केवळ कागदोपत्री सोपस्कार पार पाडण्याची क्रिया सुरू आहे.
मुरुम गेला वाहून
तुमसर - भंडारा या राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. ते बुजवण्याचा केविलवाणा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागाने केला. पावसात खड्ड्यातून मुरूम वाहून गेला व पुन्हा खड्डे हे मोकळे झाले आहेत. एप्रिल ते मे दरम्यान या खड्यात मुरूम व गिट्टी भरण्याची गरज होती. परंतु, ती भरण्यात आली नाही, पावसाळ्यात सदर खड्ड्यात मुरूम भरण्यात आला. त्यामुळे येथे नियोजनाचा अभाव स्पष्ट दिसून येत आहे. खड्ड्यात मुरूम भरण्याकरिता सुमारे 12 ते 14 लाख रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती आहे.
35 किलोमीटरचा जिल्हा मार्ग खड्डेमय
भंडारा येथे जिल्हा स्थळ जाण्यासाठी याच महामार्गाने जावे लागत असून, या रस्त्यावर ठिकठिकाणी अर्धा ते एक फुटाचे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे येथे अपघाताची मालिका सतत सुरू असून, काहींना आपल्या जिवालाही मुकावे लागले आहे. वाहनधारकांना येथे कमालीचा त्रास सहन करावा लागत असून, अनेकांना पाठीच्या मणक्यांचा आजार जडला आहे.