स्मार्ट सिटीच्या कामाचा नाही पत्ता अन् संचालकांच्या 'स्मार्ट' बाता
नागपूर (Nagpur) : पूर्व नागपुरात १ हजार ७३० एकरातील स्मार्ट सिटी प्रकल्पाची अनेक कामे रखडलेली आहेत. भूसंपादनानंतर अनेक नागरिकांना अद्यापही मोबदला मिळाला नाही. घरे मिळण्यासही विलंब होत आहे, असे असतानाही स्मार्ट सिटी मिशनचे संचालक व केंद्रीय गृह निर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे संयुक्त सचिव कुणाल कुमार (Kunal Kumar) यांनी प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर समाधान व्यक्त करीत प्रशंसाही केली.
स्मार्ट सिटी मिशनचे संचालक कुणाल कुमार नुकतेच नागपुरात येऊ गेले. स्मार्ट सिटी प्रकल्पातील रस्ते, १० पुलांचे काम, ४ जलकुंभांचे काम, एलईडी लाईट, मलनिस्सारण व्यवस्था, पाणीपुरवठा इत्यादी कार्य सुद्धा प्रगतीपथावर असल्याचे त्यांना महापालिका आयुक्तांनी सांगितले. होम स्वीट होम प्रकल्पामध्ये सदनिकांचे निर्माण काम सुरू झाले आहे. येथे मुलांकरिता खेळण्याची जागा, उद्यान, पार्किंग सुविधा, खेळण्याचे मैदान प्रस्तावित असून ही इमारत हरीत इमारत राहणार आहे.
आयुक्तांच्या माहितीनुसार कुणालकुमार कामाच्या प्रगतीवर समाधान व्यक्त करीत प्रशंसा केली. त्यानंतर त्यांनी महापालिकेतील ‘कमांड अँड कंट्रोल सेंटर’ची पाहणी केली. या सेंटरचे बांधकाम जवळजवळ पूर्णत्वास आले आहे. त्यांनी लवकरात लवकर बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. 'स्टेट ऑफ आर्ट कमांड अँड कंट्रोल सेंटर' स्मार्ट सिटीतर्फे उभारण्यात आले आहे. या सेंटरमध्ये ३२ मोठे स्क्रीन असून, शहरात लावण्यात आलेल्या ३६०० कॅमेऱ्याच्या माध्यमातून नागपुरातील सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेवणार आहेत. या माध्यमातून पोलिस विभागाला एकाच ठिकाणावरून शहरातील वाहतूक नियंत्रण व डायल ११२ च्या माध्यमातून विविध सुरक्षा व्यवस्था तत्परतेने पुरविता येणार आहे. तब्बल सात वर्षांच्या कार्यकाळा फारफार २० टक्के कामे स्मार्ट सिटीच्या प्रशासनाने केली आहे. यानंतरही मिशनचे संचालक यांनी समाधान व्यक्त केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

