अकोला (Akola) : जिल्ह्यातील ग्रामीण भागात नवीन रस्ते कामांसाठी आवश्यक असलेला ग्रामा क्रमांक मिळावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत गेल्या दीड वर्षांपूर्वी 340 ग्रामीण रस्त्यांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला त्यापैकी 48 रस्त्यांना ग्रामा क्रमांक मिळाले असले तरी जिल्ह्यातील 292 रस्त्यांना ग्रामा (ग्रामीण मार्ग) क्रमांक देण्याचा प्रस्ताव सरकार दरबारी अद्यापही लटकला आहे. ग्रामा क्रमांक मिळाला नसल्याने जिल्ह्यात ग्रामीण भागातील प्रस्तावित रस्त्यांची कामे करणार तरी कशी आणि कधी, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्ह्यातील सातही तालुक्यांत ग्रामीण भागातील 340 रस्त्यांना ग्रामा क्रमांक देण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत गेल्या 3 जानेवारी 2022 रोजी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविण्यात आला. त्यापैकी अकोला तालुक्यातील केवळ 40 रस्त्यांना 3 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार ग्रामा क्रमांक प्राप्त झाले. परंतु, 292 रस्त्यांना ग्रामा क्रमांक प्राप्त होणे अद्याप बाकी आहे.
ग्रामा क्रमांका अभावी करता येईना निधीची तरतूद व कामे
नवीन रस्ते कामासाठी ग्रामा क्रमांक आवश्यक आहे. ग्रामा क्रमांक नसल्यास संबंधित ग्रामीण रस्ते कामासाठी निधीची तरतूद आणि रस्त्यांची कामे करता येत नाहीत. त्यानुषंगाने जिल्ह्यातील 292 ग्रामीण रस्त्यांना ग्रामा क्रमांक अद्याप मिळाला नसल्याने, या रस्ते कामांसाठी निधीची तरतूद करता येत नाही. तसेच कामेही करता येत नसल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषद सर्वपक्षीय शिष्टमंडळाची सरकारकडे मागणी
जिल्ह्यातील 292 ग्रामीण रस्त्यांना ग्रामा क्रमांक देण्याचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित असल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात जिल्हा परिषदेच्या सर्वपक्षीय सदस्यांच्या शिष्टमंडळाने मंत्रालयातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. जिल्ह्यातील 292 रस्त्यांना ग्रामा क्रमांक तातडीने देण्याची मागणी करण्यात आली, अशी माहिती जिल्हा परिषदेतील सत्तापक्ष गटनेता ज्ञानेश्वर सुलताने यांनी दिली. ग्रामीण भागाच्या विकासासाठी रस्त्यांचा विकास महत्त्वाचा आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांना ग्रामा क्रमांक देण्याचा प्रस्ताव दीड वर्षापूर्वी जिल्हा परिषदेमार्फत शासनाकडे पाठविण्यात आला. जिल्ह्यातील 292 रस्त्यांना ग्रामा क्रमांक देण्याच्या प्रस्तावावर शासनाकडून अद्यापही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे संबंधित प्रस्तावास शासनाने तातडीने मंजुरी देऊन प्रस्तावित रस्त्यांना ग्रामा क्रमांक देण्याची गरज आहे. अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ यांनी दिली.
केवळ अकोला तालुक्यातील 48 रस्त्यांना मिळाला ग्रामा क्रमांक
जिल्ह्यातील ग्रामीण भागात 340 रस्त्यांना ग्रामा क्रमांक देण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेमार्फत दीड वर्षापूर्वी शासनाकडे सादर करण्यात आला. त्यापैकी केवळ अकोला तालुक्यातील 48 ग्रामीण रस्त्यांना ग्रामा क्रमांक प्राप्त झाला. 3 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रस्त्यांना ग्रामा क्रमांक मंजूर करण्यात आला.
ग्रामा क्रमांक नसलेले रस्ते
अकोट - 103
तेल्हारा - 41
मूर्तिजापूर - 55
बार्शीटाकळी - 34
बाळापूर - 31
पातूर - 28