नागपूर (Nagpur) : मेडिकल परिसरातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून काळानुरुप अतिविशेषोपचार दर्जाचे उपचार रुग्णांना उपलब्ध होणार होते. पाच वर्षांपूर्वी प्रस्ताव मंजूर झाला. मात्र आवश्यक मनुष्यबळाचा प्रस्तावाला अद्याप हिरवा झेंडा मिळाला नसल्याची माहिती पुढे आली आहे.
राज्यातील दंत चिकित्सेमध्ये सर्वात मोठे सुपर स्पेशालिटी डेंटल हॉस्पिटल नागपुरात सुरू होत आहे. यासाठी आणखी एक वर्ष प्रतीक्षा लागणार आहे. पाच वर्षांनंतरही इमारत तयार झाली नाही. तसेच आवश्यक मनुष्यबळाची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यास हिरवा झेंडा मिळालेला नाही. तीन वर्षांपूर्वी पाठवण्यात आलेला मनुष्यबळच्या प्रस्तावात नव्याने सुधारणा करून पुन्हा प्रस्तावित करण्यात आले. मात्र हा प्रस्तावही राज्य सरकारने स्वीकारला नसल्याची माहिती पुढे आली आहे. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात सुपर स्पेशालिटी उपचार मिळावे यासाठी इमारतीचा प्रस्ताव 2017 मध्ये शासनाकडे पाठवला. जागा व निधीची मागणी करण्यात आली होती. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर मेडिकल परिसरात 2052 चौरस मीटर जागा मिळाली. सहा मजली इमारत बांधण्यात येत आहे. 2018 मध्ये 26 कोटी रुपये मंजूर झाले. कामाला सुरवात झाली. पाच वर्षे लोटली, अद्याप इमारत पूर्ण झाली नाही.
प्रशासनाच्या सूचना
जिल्हा प्रशासनाने डिसेंबर 2023 पर्यंत इमारत पूर्ण करून रुग्णालय प्रशासनाकडे इमारतीचे हस्तांतरण करावे अशा सूचना दिल्या असल्याची माहिती आहे. मात्र तरीदेखील बांधकामाला गती मिळाली नाही. अंतर्गत सजावट, विद्युत काम, अग्निसुरक्षा यंत्रणा आदींसह अन्य मोठी कामे रखडली आहेत. इमारतीचे काम पूर्ण होण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागेल, असा अंदाज आहे.
पदभरतीचा दुसरा प्रस्ताव
डेंटल सुपर स्पेशालिटीमध्ये ओरल इम्प्लांटोलॉजी, अस्थेटिक डेंटिस्ट्री, कॅनिओफेशियल सर्जरी, फॉरेन्सिक ऑडिओलॉजी, डिजिटल डेंटिस्ट्री आणि इतर आधुनिक उपचार पद्धतींचे विभाग असतील. त्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आवश्यक आहे. त्यामुळे येथील 133 पदांवर भरती होणार आहे. ही प्रक्रिया सरकारने पूर्ण करावी. मात्र त्यासाठी पाठवलेल्या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. दोन वेळा प्रस्ताव सादर केला. सहा महिने उलटले आहेत. मात्र यालाही मंजुरी मिळालेली नाही. 133 पदांपैकी 111 पदांवर कायमस्वरूपी तर 22 पदांची कंत्राटी पद्धतीने भरती करावयाची आहे.