नागपूर (Nagpur) : भारतात एकूण 20 ट्रीपल आयटी अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्था काही वर्षांपूर्वी साकारण्याचा धोरणात्मक निर्णय भारत सरकारने घेतला होता. तेव्हाच ही संस्था नागपुरात साकारावी यासाठी गडकरींनी आग्रह धरला. मात्र या संस्थेसाठी किमान शंभर एकर जागा उपलब्ध करुन देण्याची अट केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी ठेवली. देवेंद्र फडणवीस तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांना नागपुरात येऊ घातलेल्या या संस्थेसाठी जागा उपलब्ध करुन देण्याबाबत चर्चा केली. त्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करुन अत्यंत कमी कालावधीत ही जागा उपलब्ध करुन दिल्यामुळे नागपुरात ही संस्था प्रत्यक्षात येऊ शकली.
बुटीबोरी जवळील वारंगा येथे सुमारे शंभर एकर परिसरात साकारलेल्या भारतीय तंत्रज्ञान संस्था व परिसराच्या लोकार्पण सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. ज्ञान हीच खरी मोठी शक्ती आहे. भारतातील युवकांनी आयटीच्या क्षेत्रात आपले कौशल्य पणाला लावून जागतिक पातळीवर आपला अपूर्व ठसा निर्माण केला आहे. संपूर्ण जगात आयटीच्या क्षेत्रात सर्वाधिक मनुष्यबळ हे भारताचे आहे.
अधिकाधिक रोजगाराच्या निर्मितीसाठी चांगल्या कंपन्या निर्माण होणे हे आवश्यक असून विविध उद्योजकांना पायाभूत सुविधाही आपण दिल्या पाहिजेत. त्यादृष्टीने प्रयत्न सुरु असून मिहानचा विस्तार गुमगाव व इतर भागात करता येईल का याबाबत चाचपणी सुरु असल्याचे गडकरी यांनी सांगितले. पायाभूत सुविधांचा विकास आपण उत्तम प्रकारे साध्य करू शकलो. यासमवेत स्थानिकांचा विकास आणि संधी यावर प्राधान्याने काळजी घेवू असे त्यांनी स्पष्ट केले.