
नागपूर (Nagpur) : नागपूर शहरात विविध ठिकाणी बागा (Gardens) असल्या तरी तेथे दिव्यांगांना जाण्यास अनेक अडचणी येतात. दिव्यांगांचे मनोरंजन व प्रशिक्षण डोळ्यासमोर ठेवून पूर्व नागपुरात राज्यातील पहिला आणि जगातील सर्वांत मोठा सर्वसुविधांयुक्त दिव्यांग पार्क सहा महिन्यांत उभा राहणार आहे.
केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी (ता. 20) रस्तेनागपुरच्या सूर्यनगरस्थित लता मंगेशकर गार्डन जवळ पारडी येथे जगातील सर्वांत मोठा सर्वसुविधांयुक्त अनुभूती इंक्लूझिव्ह पार्कचे (दिव्यांग पार्क) भूमिपूजन केले. या पार्कात दिव्यांगांच्या मनोरंजनासोबतच अभ्यास व प्रशिक्षणाची देखील सोय असेल. याशिवाय पार्कमध्ये डायग्नोसिस व इतर उपचारांचीही व्यवस्था राहणार आहे.
12 कोटीं मध्ये साकारणार दिव्यांग पार्क
केंद्र सरकारने या अनुभूती इंक्लूझिव्ह पार्कसाठी (दिव्यांग पार्क) 12 कोटी निधी उपलब्ध करून दिला आहे. नागपूर सुधार ट्रस्टला (NIT) या दिव्यांग पार्कचे काम देण्यात आले आहे. या पार्कचा संपूर्ण आराखडा तयार झाला आहे. 12 कोटी व्यतिरिक्त निधीची गरज पडली तर तो एनआईटी देणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.
एकूण 2 एकर जमिनीवर बनणाऱ्या दिव्यांग पार्कची वर्क ऑर्डर निघाली असून, यासाठी चांगला आर्किटेक्ट नियुक्त करण्यात आला आहे. या पार्कमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सर्व बाबी लक्षात घेऊन दिव्यांग पार्कचे प्लानिंग केले असून 6 महिन्यांत त्याचे काम पूर्ण करण्याची माहितीही गडकरींनी दिली.
...अशा असणार दिव्यांग पार्कमधील सुविधा
- दृष्टिहिनांसाठी टच व स्मेलिंग गार्डन
- झाडे ओळखण्यासाठी ब्रेल भाषेत पट्टी, ब्रेलयुक्त बुद्धिबळ, सापसिडी व इतर खेळ
- दिव्यांगसाठी आऊटडोर स्टेडियम असणार जिथे दिव्यांग संगीत ऐकू आणि वाचू शकणार.
- ओपन जिम आणि ओपन हॉल.
- दिव्यांगांसोबत सामान्य वयोवृद्ध लोकांनादेखील लाभ मिळणार.
- ऑटिस्टिक मुलांसाठी देखील ब्लू रूमची व्यवस्था.
- स्पीच थेरेपी, वॉटर थेरेपी, हायड्रोथेरपी पॉईंटची सोय सोबत 7 प्रकारच्या थेरेपी.
- पार्कमध्ये फिरण्यासाठी बॅटरीवर चालणारी वाहने व व्हीलचेअर.
- दिव्यांगांच्या सुविधासाठी जागोजागी रेलिंग्ज.
- दिवसभरात नाश्ता आणि जेवणाची सोय.
दिव्यांगांमध्ये शिक्षणाचा विकास करतानाच कौशल्याचा विकासही झाला पाहिजे. लोकसंख्येच्या 3 टक्के लोक हे दिव्यांग आहेत आणि 5 टक्के वयोवृद्ध यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिव्यांग पार्क साकार होत आहे. या पार्कमध्ये येऊन ते आनंदी राहतील, अशी व्यवस्था असेल अशी माहिती गडकरी यांनी दिली