यवतमाळ (Yavatmal) : शहराला लागूनच बुटीबोरी-यवतमाळ-तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग क्र. 361 गेला आहे. या महामार्गामुळे प्रवास सुकर झाला असून, याचा लाभही होत आहे. मात्र, यवतमाळ शहरात प्रवेश करताना या महामार्गावर नियोजन करण्यात आलेले नाही. परिणामी तांत्रिक चुकांमुळे महामार्गावरून शहरात येताना विरुद्ध दिशेने यावे लागत आहे. यातून अनेक अपघातही घडले आहेत. ही चूक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुधारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी तीन उड्डाणपूल उभे केले जाणार आहेत.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून उड्डाणपूल निर्मितीसाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून, 99 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. प्रत्येकी 33 कोटी रुपये खर्चुन हे तीन उड्डाणपूल बांधले जाणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग यवतमाळ शहराला लागून गेल्याने नांदेड व नागपूरकडे जाणाऱ्या वाहनांचा वेळ वाचत आहे. नागपूरला दोन ते अडीच तासांत पोहोचता येत आहे. शिवाय वाहतूक कोंडीची कटकटही कायमची मिटली आहे. या सुविधेसोबतच मोठी समस्याही निर्माण झाली होती, ती शहरात प्रवेश करताना विरुद्ध दिशेने यावे लागत होते. यातून अपघात वाढले होते.
आता नागपूर मार्गावर हुंडाई शोरूमजवळ उड्डाणपूल होणार आहे. तसेच घाटंजी-अकोला बाजार जाणाऱ्या मार्गावरही उड्डाणपूल प्रस्तावित आहे. वनवासी मारुती मंदिराजवळ उड्डाणपूल होणार आहे. त्यामुळे शहरात प्रवेश करण्यासाठी करावी लागणारी कसरत ही थांबणार आहे. आणि नागरिकांना होणार त्रास सुद्धा कमी होईल.