नागपूर (Nagpur) : मागील दीड वर्षापासून नागपूर शहरातील रामदासपेठ पुलाचे काम सुरु होते. त्यामुळे नागरिकांना येण्याजाण्यासाठी खूप त्रास होत होता. पण हे पुल दुचाकी वाहनांच्या वाहतुकीसाठी गुरूवारी सुरू करण्यात आला. मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने व मुख्य अभियंता राजीव गायकवाड यांनी पूलाचे निरीक्षण केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. लहाने यांनी पूल दुचाकी वाहनांच्या वाहतुकीसाठी सुरू करण्याचे निर्देश दिले.
यावेळी कार्यकारी अभियंता विजय गुरूबक्षाणी व कमलेश चव्हाण, उप अभियंता प्रमोद मोखाडे व महापालिकेचे अनेक अभियंता उपस्थित होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रामदासपेठ येथील ग्रंथालयाजवळ नाग नदीवर नागपूर महानगरपालिकेद्वारे पुलाचे बांधकाम करण्यात आलेले आहे. या पुलाच्या बांधकामासाठी 8 कोटी रुपये राशी प्रस्तावित आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये कामाला सुरूवात झाली असून पुलाचे एका बाजुचे काम पूर्णत्वास आलेले आहे. पुलाचे 43 गर्डर कास्टींगचे काम पूर्ण झालेले असून 26 गर्डर ठेवण्यात आले आहेत. उर्वरित गडर टाकण्याचे काम देखील सुरू आहे.
अर्ध्या भागावर स्लॅब टाकण्याचे काम सुध्दा पूर्ण झालेले आहे. या अर्ध्या भागाच्या दोन्ही बाजूने अॅप्रोच रस्त्याच्या कामाकरीता संरक्षण भिंतींचे काँक्रिटीकरण करण्यात आलेले आहे. उर्वरीत अर्ध्या भागाचे गर्डर लॉंचींगचे काम सुरू असुन स्लॅब टाकणे, ड्रेन टाकणे, पॅरापीट भिंत व उर्वरीत अॅप्रोच रस्त्याचे डांबरीकरणसह रिटेनिंग वॉलचे काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने सध्या दुचाकी वाहने आणि पायी चालणा-या व्यक्तींकरीता एका बाजुने पूल सुरू करण्यात आलेला आहे. दोन्ही दिशेने ये-जा करणाऱ्या चार चाकी वाहानामुळे वाहतुक कोंडी होण्याची शक्यता असल्याने सध्या दोन्ही दिशेने केवळ दुचाकी वाहनांसाठी पुल सुरु करण्यात आले आहे. मागील महिन्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रामदासपेठ पुलाच्या कामाला होत असलेल्या दिरंगाईबद्दल नाराजी व्यक्त केली होती. यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार विकास ठाकरे यांनीही पुलाच्या कामाला होत असलेल्या दिरंगाईबाबत प्रश्न उपस्थित केला. 31 जानेवारीपर्यंत पुलाचा काही भाग सुरू करण्याचे आश्वासन महापालिका आयुक्तांकडून दोन्ही लोकप्रतिनिधींना देण्यात आले आहे.