
नागपूर (Nagpur) ः नागपूर शहरातील अरुंद रस्ते, तसेच वस्त्यांतील गल्ल्यांमधील सिवेज चेंबर सहज स्वच्छ करण्यासाठी महापालिकेने तीन रोबोट (Robot) मशीन भाड्याने घेतल्या आहेत. एका मशीनचे सात लाख रुपये भाडे देण्यात येत आहे. परंतु या मशीनची किंमत साडेपाच ते सहा लाखांपर्यंत असून महापालिका जनतेच्या पैशाची लूट करीत असल्याचा आरोप होत असल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
शहरातील रुंद व मोठ्या रस्त्यांवरील चेंबर स्वच्छतेसाठी महापालिकेकडे १० जेटींग मशीन आणि ४ सक्शन मशीन आहेत. परंतु वस्त्यांमधील लहान अरुंद रस्ते, गल्ल्यांमध्ये स्वच्छतेसाठी नागपूर स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाने अत्याधुनिक रोबोट मशीन भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतला होता. ही मशीनद्वारे आता शहरातील चेंबरची स्वच्छता करण्यात येत आहे. शहरातील मॅनहोल्सच्या स्वच्छता आणि देखभालीसाठी घेण्यात आलेल्या विद्युत रोबोटला कॅमेरा व यांत्रिकी हात आहेत. हा रोबोट साधारणतः १० मीटर खोल जाऊन मॅनहोल स्वच्छ करू शकतो. त्यामुळे सिवेज लाईन तुंबण्याचे प्रकार कमी होण्याची शक्यता आहे.
एका मशीनसाठी सात लाख रुपये भाडे देण्यात येत आहे. तीन मशीनसाठी २१ लाख रुपये महिन्याकाठी खर्च येणार असून, वर्षभरात भाड्याचा खर्च अडीच कोटी रुपयापर्यंत आहे. परंतु या मशीनच्या किंमतीबाबत राष्ट्रवादीचे नेते वेदप्रकाश आर्य यांनी वेगळाच दावा केला आहे. त्यांनी काही कंपन्यांच्या संकेतस्थळावर जाऊन या मशीनच्या किमतीबाबत माहिती घेतली. या मशीनची किंमत साडेपाच ते सहा लाख रुपये असल्याचे ते म्हणाले. या मशीनला आणखी अत्याधुनिक केले तरीही या मशीनचा खर्च दहा लाखांच्या वर नाही, असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीने घेतलेल्या या मशीन वादात सापडण्याची शक्यता आहे.
दरम्यान हा पायलट प्रकल्प असून अरुंद रस्ते, गल्ल्यांमध्ये चेंबर स्वच्छ करणे अडचणीचे ठरते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रोबोटद्वारे स्वच्छता प्रणालीची मदत होणार असल्याचे एका अधिकाऱ्याने नमूद केले.