
नागपूर (Nagpur) : गुंठेवारीअंतर्गत भूखंड नियमितीकरणासाठी लाखावर अर्ज आले असून, ते निकाली काढण्यात येत आहेत. अनेक ले-आऊटमध्ये भूखंडांची योग्य पद्धतीने मोजणी झाली नाही. अशा भूखंडांची मोजणी करणे, रस्त्यासाठी जागा निश्चित करणे आदी कामासाठी नासुप्रने खाजगी कंपनीची नियुक्ती केली आहे.
नासुप्रच्या बैठकीत मेसर्स वेव्हस टेक इंडिया या कंपनीचे टेंडर मंजूर केले. सध्या गुंठेवारीअंतर्गत ले-आऊटमधील भूखंडांच्या नियमितीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. अनेकांचे भूखंड नियमित करण्यात आले, अनेकांचे करण्यात येत आहे. डिसेंबरपर्यंत ७० हजार भूखंड नियमित होईल, असा दावा केला जात आहे. ले-आऊटमध्ये अनेक भूखंडांची मोजणी झाली नाही. त्यामुळे त्यांना आरएल देण्यात अडचणी निर्माण होत आहेत. अजूनही अनेक ले-आऊट एनए सुद्धा झाले नाहीत. त्यामुळे या भूखंडांची मोजणी करणे, या ले-आऊटमध्ये मोकळी जागा व रस्त्यांसाठी जागा निश्चित मेसर्स वेव्हस टेक इंडिया कंपनीच्यावतीने केली जाणार आहे.
या कंपनीच्या कंपनी ले-आऊटमधील भूखंडांची मोजणी करणार आहे. त्यामुळे नागरिकांना सीटी सर्वे कार्यालयात मोजणीसाठी फेऱ्या मारण्याची गरज राहणार नाही. कंपनीने मोजणी केल्यानंतर ले-आऊटचे एनए होईल तसेच भूखंडधारकांना आरएल देण्याचा मार्गही मोकळा होणार आहे. नागरिकांना डिमांड मिळेल, ती भरताच आरएल मिळणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत अनधिकृत ले-आऊट एनए करण्याचीही ग्वाही दिली. त्यामुळे नागरिकांची सीटी सर्वे कार्यालयात अनेक महिने फेऱ्या मारण्याचा त्रास कमी होणार आहे. लवकरच डिमांड भरल्यानंतर लेगच स्वयंचलित पद्धतीने आरएल जनरेट करण्यासंदर्भातही पाऊले उचलण्यात येणार आहे.