
नागपूर (Nagpur) : कळमेश्वर तालुक्यातील गोवरी येथे चंद्रभागा नदीवर बांधण्यात येत असलेल्या पुलाचे काम पूर्ण झाले. मात्र, पुलाला जोडणाऱ्या तीन रस्त्यांचे बांधकाम अपूर्ण आहे. याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्याचे आदेश कंत्राटदाराला दिले. या कामाचा अहवाल चार आठवड्यात सादर करण्याचे आदेश दिले आहे.
या अपूर्ण विकासकामांविरुद्ध अँड. अरविंद वाघमारे यांनी जनहित याचिका दाखल केली. न्यायमूर्ती अतुल चांदुरकर आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या समक्ष सुनावणी झाली. याचिकेनुसार गोवरी गावात चंद्रभागा नदीवर केवळ अडीच फूट पूल होता. पावसाळ्यात पूल नेहमीच पाण्याखाली येतो. पुलामुळे दहा जणांचा मृत्यूही झाला आहे. यामुळे नवीन पुलासाठी रस्ता करण्यासाठी जुना पूल पाडण्यात आला. तर ये-जा माहिती करण्यासाठी तात्पुरता पूल बांधण्यात आला होता, मात्र हा पूल वाहून गेला त्यामुळे, चंद्रभागा नदीवरील पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश द्यावे अशी विनंती करणारी जनहित याचिका दाखल करण्यात आली.
न्यायालयाने आतापर्यंत दिलेल्या आदेशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याची माहिती दिली होती. त्यामुळे ठेकेदाराने प्रतिज्ञापत्र दाखल करून पावसामुळे काम थांबल्याची माहिती न्यायालयाला दिली. याचिकाकत्यनि पुलाला जोडणाऱ्या तीन रस्त्यांच्या अपूर्ण बांधकामाचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. त्यावर न्यायालयाने कंत्राटदाराला रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले.