
नागपूर (Nagpur) : महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण कार्यान्वित होईपर्यंत हाफकिन महामंडळाच्या खरेदीचे सर्व अधिकार वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांना देण्यात आले आहे. यामुळे नागपूरच्या मेडिकल व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची सहा वर्षांपासून हाफकिनकडे प्रलंबित असलेली जवळपास 100 कोटींची औषधे, यंत्र सामग्री, उपकरणे खरेदी होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
2017 मध्ये आरोग्य संस्था, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना आवश्यक असणारी यंत्रसामग्री, साधनसामग्री, उपकरणे, औषधे, सर्जिकल्स साहित्य एकत्रित खरेदी करण्याचे अधिकार हाफकिन महामंडळाला देण्यात आले. परंतु हाफकिनकडे निधी जमा असायचा पण वर्षानुवर्षे खरेदी प्रक्रियाच होत नव्हती. यामुळे औषधांचा तुटवडा होऊन रुग्नणांना त्रास होत होता. तर यंत्रसामग्रीच्या अभावामुळे रुग्णांना वेठीस धरले जात होते.
या पार्श्वभूमीवर सरकारने महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण कार्यान्वित करून त्यांच्याकडून खरेदी प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला. परंतु प्राधिकरण कार्यान्वित होईपर्यंतच्या कालावधीसाठी हाफकिन महामंडळाच्या खरेदी कक्षासंदर्भातील सर्व अधिकार वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या आयुक्तांना प्रदान करण्याचा निर्णय 28 फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात आला. यामुळे राज्यभरातील सर्व शासकीय रुग्णालयांमधील औषधे व यंत्रसामग्री खरेदीचा प्रश्न सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
25 कोटींच्या यंत्रांची 'सुपर' स्पेशलिस्टला प्रतिक्षा
गरीब, निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना अद्ययावत उपचार मिळावा म्हणून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने यंत्र खरेदीसाठी हाफकिनच्या खात्यात 2017 पासून जवळपास 39 कोटी जमा केले. परंतु सहा वर्षांत केवळ 11 कोटींचीच यंत्र खरेदी झाली. एका यंत्राची खरेदी प्रक्रिया रखडल्याने नुकतेच अडीच कोटी 'सुपर'च्या खात्यात वळते करण्यात आले. यामुळे जवळपास 25 कोटींच्या यंत्र खरेदीची प्रतीक्षा सुपर'ला आहे. यात एमआरआय, 'कॅथलॅब', 'फायब्रोस्कॅन, 'डिजिटल रेडिओलॉजी', 'इंडोस्कोपी', 'लिव्हर ट्रान्सप्लांट यंत्रसामग्री व 'व्हेंटिलटर'चा समावेश आहे.
औषधीचे 24 कोटी हाफकिनकडे
मेडिकलला लागणारी औषधे व सर्जिकल साहित्याचे जवळपास 24 कोटी रुपये हाफकिनकडे जमा आहेत. परंतु अद्यापही आवश्यक असणारी खरेदी झालेली नाही. परिणामी, मेडिकल प्रशासनाला स्थानिक पातळीवर औषधी खरेदी करण्याची वेळ आली आहे.
हवे 60 कोटींचे यंत्र
मेडिकलमधील यंत्र सामग्रीसाठी जवळपास 60 कोटींचा निधी हाफकिनकडे पडून आहे. या निधीतून 'रोबोटिक यंत्र', 'लिनिअर ऑक्सेलेटर', 'न्यूक्लिअर मेडिसिन यंत्र', 'बॅकेथेरपी' यासारख्या यंत्राच्या खरेदीची प्रतिक्षा आहे.