
नागपूर (Nagpur) : G-20 परिषदेची बैठक उपराजधानी नागपूर येथे होणार असून, यानिमित्त शहरात ठिकठिकाणी सौंदर्यीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. यासाठी नागपूर महापालिकेला 50 कोटी रुपये मिळाले असून, यामधून महापालिकेचा उद्यान विभाग एकूण 23 कोटी निधी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा हिरवळ करण्यावर खर्च करत आहे. त्यात शहरातील मुख्य चौकाच्या सौंदर्यीकरणावर भर देण्यात येत आहे. ज्यापैकी काही चौकाच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू झाले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ ते प्राइड हॉटेल - ल मेरिडीएन हॉटेल या रस्त्यावर दोन्ही बाजूला हॉर्टिकल्चरचे काम सुरू आहे, अशी माहिती महापालिकेचे उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांनी दिली. या सोबतच उद्याने आणि रस्ता दुभाजकांचे सुशोभीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
अजनी चौक ते रहाटे कॉलनी, भोले पेट्रोल पंप ते जीपीओ या रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवळीचे काम सोबतच सिव्हिल लाईन कार्यालयात देखील हिरवळीचे काम सुरू आहे. नागपूर शहरातील प्रसिद्ध गोवारी स्मारकाच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. या संपूर्ण हिरवळीच्या कामावर चक्क 23 कोटी निधी महापालिका खर्च करत आहे.
आतापर्यंत दुरवस्था झालेल्या उद्यानांचीही दशा पालटणार असून लँडस्केपिंग केले जाणार आहे. क्लॉक टॉवर दुरुस्ती करण्यात आली असून, तेथे रंगबिरंगी फवारे करण्यात आले आहेत. येथून ते रहाटे कॉलनी या रस्त्याच्या दुतर्फा हिरवळ तयार केली जात आहे. चौकाचौकात झेब्रा क्रॉसिंग, ट्रैफिक सिग्नलचे मार्किंग, दुरुस्ती आणि रंगकामही करण्यात येणार आहे.
G-20 परिषदेच्या बैठकीत सहभागी होणारे विविध देशांचे प्रतिनिधी शहरातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटनस्थळांची पाहणी करणार आहेत.