Nagpur : रामदासपेठ पुलाचे काम महिन्याभरात सुरू करा, अन्यथा...

Nagpur
NagpurTendernama

नागपूर (Nagpur) : रामदासपेठ पुलासाठी आम आदमी पार्टीने (AAP) आपला आवाज उचलला आहे. भाजप (BJP) नेत्याच्या कंत्राटदार (Contractor) मुलाऐवजी मनपाने नागरीकांचे हित जोपासावे अशी टीका करत रामदासपेठ पुलासाठी आपने आंदोलन केला. महिन्याभरात पुलाचे काम गतीने सुरू न झाल्यास मनपा मुख्यालयाकडे जाणारे रस्ते अडवू, असा इशारा आपने मनपा आयुक्तांना दिला आहे.

Nagpur
TMC: ब्रह्मांड व वाघबिळ पादचारी पुलांसाठी कार्यादेश; 10 कोटींचा...

नागपूर विद्यापीठ ग्रंथालय रामदासपेठ येथील रखडलेल्या पुलाच्या मुद्यावर आम आदमी पार्टीने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. आपच्या पश्चिम नागपूर विभागातर्फे रामदासपेठ येथे नागपूर महानगर पालिकेतर्फे लक्षवेधी निदर्शने करण्यात आली. आपचे पश्चिम नागपूरचे संयोजक अभिजीत झा यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात विविध मुद्द्यांवर नारेबाजी करण्यात आली.

यावर्षी 8 ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे रामदासपेठ येथील नाल्यावरील पुलाची सुरक्षा भिंत वाहून गेली होती. त्यानंतर महानगरपालिकेकडून हा संपूर्ण पूल पाडण्यात आला. दरम्यानच्या काळात नव्याने पूल बांधण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली. तब्बल 8 कोटी रुपये खर्चून हा पूल बांधण्यात येणार आहे. भाजपचे भंडारा-गोंदिया मतदारसंघाचे खासदार सुनील मेंढे यांचे पुत्र सिद्धार्थ व भाऊ अनिल मेंढे यांच्या सनी इन्फ्राप्रोजेक्ट प्रायवेट लिमिटेड या कंपनीला मनपाने पूलाच्या बांधकामाचे कंत्राट दिले.

ऑक्टोबर महिन्यात यासंबंधिचे कार्यादेश देण्यात आले. मात्र चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला तरी पूलाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरवात झालेली नाही. प्रत्यक्षात 18 महिन्यात पूलाचे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित असतांना कंत्राटदाराचे काम कासवगतीने सुरू आहे. पुलाच्या बांधकामामुळे रामदासपेठकडून महाराजबागकडे जाणारा मुख्य रस्ता बंद करण्यात आला आहे. गेल्या 7 महिन्यापासून हा रस्ता बंद असल्याने नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शाळकरी मुलांना लांबच्या रस्त्याने जावे लागत आहे, अनेक ज्येष्ठ नागरीकांचे महाराजबागकडे माॅर्निंग वाॅकला जाणे बंद झाले आहे.

सिव्हिल लाईन्सकडे जायला हा महत्त्वाचा रस्ता होता, मात्र रस्ता बंद असल्याने वाहनचालकांना लांबचा पल्ला गाठावा लागत आहे. या परिसरात अनेक रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यातच हा महत्त्वाचा रस्ता बंद झाल्याने या परिसरातील वाहतूक रामदासपेठेतील छोट्या गल्ल्यांमधून वळवण्यात आली आहे. दिवसभर वाहनांची ये-जा, गाड्यांच्या हाॅर्नचा कर्णकर्कश आवाज यामुळे रामदासपेठेतील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Nagpur
CS: सातारा - देवळाईकरांच्या रस्त्यांची कोणी लागली वाट?

आम आदमी पार्टीने पुलाच्या बांधकामात होणारा विलंब व कंत्राटदारावर मनपाची मेहेरबानी हे मुद्दे उचलून धरत मनपाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहे. पश्चिम नागपूर आपचे संयोजक अभिजीत झा यांनी मनपाच्या कारभारावर टीकेची झोड उठवत या पूलाचे बांधकाम किती दिवसात पूर्ण होणार असा सवाल विचारला आहे.

महानगरपालिकेने कंत्राटदार भाजप नेत्याच्या मुलाच्या हिताऐवजी नागरीकांचे हित जोपासावे असेही ते म्हणालेत. मनपाच्या ढिसाळ नियोजनामुळे अनेक प्रकल्प अपूर्ण अवस्थेत आहे. मोक्षधाम घाटाजवळ बांधण्यात आलेल्या पुलासाठी 12 महिन्याऐवजी 5 वर्षे लागली. तसेच झिरो माईल मेट्रो स्टेशनजवळील डीपी रस्ता तयार करण्यासाठी मनपाला 6 वर्षे लागली आहे. याशिवाय महाराजबागेतून जाणाऱ्या रस्त्यावर पूल बांधण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे हा पूल खरच वेळेत पूर्ण होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. पूल नेमका कशामुळे खचला याबद्दल महानगरपालिकेने कुठलीही चौकशी न करता दोषींना पाठीशी घातल्याचा आरोप त्यांनी केला.

नाल्यावरील सुरक्षा भिंत पडली असतांना इतर आवश्यक उपाययोजना न करता सरसकट पूल पाडण्याचे कारण काय, हा पूल पाडण्यापूर्वी महानगरपालिकेने तांत्रिक बाजू तपासून पाहिल्या होत्या का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. याबाबत जे आक्षेप घेतले जात आहे त्याबद्दल मनपा आयुक्तांनी उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी आम आदमी पक्षातर्फे करण्यात आली आहे.

रामदासपेठ येथील नागरीकांना होणारा  त्रास, वाहनचालकांची होणारी गैरसोय पाहता मनपा आयुक्तांनी याप्रश्नी विशेष लक्ष देऊन मार्ग काढावा, अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. येत्या महिन्याभरात पूलाचे बांधकाम पूर्ण क्षमतेने सुरू झाले नाही तर मनपा मुख्यालयाकडे जाणारे रस्ते अडवून धरू असा इशारा आम आदमी पार्टीने दिला आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com