नागपूर (Nagpur) : राज्यात सुरू असलेल्या वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेच्या निधी वाटपाची सचिवांमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी विधानसभेत सांगितले.
सदस्य संतोष बांगर यांनी तांडा वस्ती सुधार योजनेच्या निधी वाटपात अनियमितता झाल्याबाबत लक्षवेधीद्वारे उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, या योजनेंतर्गत विद्युतीकरण, पिण्याचे पाणी, अंतर्गत रस्ते, गटारे, शौचालये, समाज मंदिर, वाचनालये, समाजमंदिर बांधणे या अग्रक्रमाने पायाभूत सुविधांची कामे केली जातात. लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार अंतर्गत रस्त्यांसोबत पेव्हर ब्लॉक बसविणे या कामाचा शासन मान्यतेने समावेश करण्यात आला आहे.
या योजनेंतर्गत कामे जिल्हाधिकारी यांच्याकडून मंजूर होऊन निधीसाठी शासनस्तरावर येतात. त्यांच्याकडून मंजूर कामांनाच निधी दिला जातो. या योजनेसाठी निधी उपलब्ध झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केलेल्या कामांना निधी दिला जात आहे. या निधी वाटपाला विलंब होणार नाही, असेही मंत्री सावे यांनी स्पष्ट केले. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य बच्चू कडू यांनी सहभाग घेतला.