
नागपूर (Nagpur) : कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) अग्निशमन यंत्रणा बसविण्यासाठी व्यवस्थापन मंडळाने 27 सप्टेंबरला 7 कोटी रुपयांचे टेंडर काढले आहे. त्यानुसार बाजारात अद्ययावत यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्यामुळे कृषी मालाचे संरक्षण होण्याची अपेक्षा व्यापारी व्यक्त करीत आहेत.
डिसेंबर-2022 मध्ये कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मिरची बाजारात मध्यरात्री लागलेल्या आगीत कोट्यवधींचा माल जळाला होता. त्यानंतर समितीच्या व्यवस्थापन मंडळाने निर्णय घेत संपूर्ण 150 एकरातील बाजारपेठांच्या सुरक्षेसाठी अग्निशमन यंत्रणा बसविण्याचा तातडीने निर्णय घेतला आणि प्रस्ताव तयार करून मंत्रालयात संबंधित विभागाकडे पाठविण्यात आला. या कामाचे टेंडर काढण्यासाठी सप्टेंबर महिन्यात मंजुरी मिळाली. त्यानुसार निविदा काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे एपीएमसीला आगीपासून सुरक्षा कवच मिळणार आहे. जवळपास 150 एकरातील एपीएमसीमध्ये आतापर्यंत आगीच्या बचावासाठी कोणतीही पाऊले उचलण्यात आली नव्हती. त्यामुळे व्यापाऱ्यांना मालाच्या सुरक्षेसंदर्भात असुरक्षितता जाणवत होती. पण, आता टेंडर काढल्याने व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
प्रस्तावाला पुणे पीडब्ल्यूडीकडून तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतरच टेंडर जारी केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. जवळपास 25 दिवसात टेंडर प्रक्रिया पूर्णत्वास येईल. निविदेनुसार जवळपास 150 एकरात अग्निशमन यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्याकरिता भूमिगत पाइपलाइन टाकण्यात येईल. 150 हायड्रोलिक यंत्रणा लावण्यात येईल आणि प्रत्येक हॉलमध्ये 5 फायर अग्निरोधक बसविण्यात येणार आहे. लवकरच रस्ते बनविण्याची प्रक्रिया सुरू होईल. डिसेंबर महिन्यात मिरची बाजाराला आग लागली होती. त्यानंतर काहीच दिवसात प्रस्ताव तयार करून संबंधित विभागाला पाठविला होता. पण, कामासाठी निविदा काढण्याची मंजुरी आता मिळाली आहे. त्यानुसार निविदा काढण्यात आल्या आहेत. लवकरच कामाला सुरुवात होईल. अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती, नागपूरचे सभापती अहमद शेख यांनी दिली.