
नागपूर (Nagpur) : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासाठी अखेर रविभवन परिसरातील शासकीय बंगला शोधण्यात आला आहे. त्याला 'विजयगड' हे नाव देत देखभाल दुरुस्तीसह सजावट केली जात आहे. मात्र, या हायप्रोफाइल बंगल्याच्या दुरुस्तीसाठी कंत्राटदाराने तब्बल 48 टक्के 'बिलो' दराने टेंडर भरून काम घेतले आहे. अंदाजित खर्चाच्या अर्ध्या रकमेत हे काम किती दर्जेदार होईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राजकीय उलथापालथीनंतर 2 जुलै 2023 रोजी अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. नागपुरात उपमुख्यमंत्र्यांसाठी 'देवगिरी' बंगला आहे. मात्र, तेथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुक्काम असेल. त्यामुळे अजित पवार यांच्यासाठी दुसऱ्या बंगल्याचा शोध घेतला गेला. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सहपोलिस आयुक्त यांच्या रविभवन परिसरातील बंगल्यावर शिक्कामोर्तब झाले. या बंगल्याला 'विजयगड' असे नाव देण्यात आले.
या बंगल्याच्या देखभाल दुरुस्ती सजावटीसाठी सार्वजनिक व बांधकाम विभागाने आतील कामांसाठी 48 लाख व बाहेरील कामांसाठी 68 लाख रुपयांची निविदा जारी केली. 9 नोव्हेंबर रोजी टेंडर उघडण्यात आली. यावेळी आतील कामांसाठी तब्बल 55.76 टक्के बिलो व बाहेरील कामांसाठी 21.60 टक्के बिलो टेंडर भरणारे ठेकेदार संकल्प आदमने यांना काम देण्यात आले. दुसऱ्याच दिवशी वर्क ऑर्डर देऊन काम सुरू करण्यात आले. आता कामाचा आवाका व खर्च पाहता 30 नोव्हेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला बरीच कसरत करावी लागणार आहे. ही परिस्थिती पाहता आता पीडब्ल्यूडीने विविध एजन्सींची मदत घेण्यास सुरुवात केली आहे. आता या एजन्सींची बिले कशी दिली जातील, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अधिकारी म्हणतात, काम वेळेवर पूर्ण करण्यास प्राधान्य :
पीडब्ल्यूडीचे अधिकारी यासंदर्भात उघडपणे बोलण्यास तयार नाहीत. त्यांचे म्हणणे आहे की, 30 नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण करण्यास आमचे प्राधान्य आहे. कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी एक समिती आहे. त्या समितीने हिरवी झेंडी दिल्यावरच बिलाची रक्कम दिली जाईल. ठेकेदाराकडून अतिरिक्त सुरक्षा ठेव घेतली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
'विजयगड' बंगल्याच्या लॉनवर उभारणार डोम :
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी येणाऱ्यांची गर्दी असेल. याची जाणीव ठेवत बंगल्यासमोरील लॉनवर डोम उभारण्यात येणार आहे. विरोधी पक्षनेत्याच्या बंगल्याच्या बाजूला पार्किंगची व्यवस्था केली जाईल. कर्मचाऱ्यांसाठीही मंडप उभारण्यात येणार आहे.