
नागपूर (Nagpur) : 234 कोटी खर्च करून 4 प्रकल्पांपैकी एक जयस्तंभ चौक ते एलआयसी चौक आणि श्रीमोहिनी कॉम्प्लेक्स चौक ते रिझर्व्ह बँक चौकापर्यंत वाय आकाराचा पूल तयार करण्यात आला आहे. पूलाचे संपूर्ण बांधकाम पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी बांधकाम सुरूच आहे. काम पूर्ण न झाल्यामुळे उद्घाटनाची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. जोपर्यंत पूलाचे उद्घाटन होत नाही, तोपर्यंत किंग्जवे, रेल्वे स्थानक, रामझुला, झिरो माईल टी-पॉइंट येथील वाहतूककोंडीची समस्या सुटणार नाही.
गेल्या चार वर्षांपासून ही समस्या आहे. मार्च 2019 मध्ये महामेट्रोने नॅशनल कन्स्ट्रक्शन कंपनीला कंत्राट दिले होते. करारानुसार पुलाचे बांधकाम डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण करायचे होते. पूलाच्या उद्घाटनाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. धक्कादायक बाब म्हणजे महामेट्रोने हा पूल अद्याप सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुपूर्द केलेला नाही.
लवकर सुरु करण्याची मागणी
गेल्या 4 वर्षांपासून सुरू असलेल्या बांधकामामुळे वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होत आहे. विशेषत: रेल्वे प्रवाशांना रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. वाय आकाराचा पूल सुरू झाल्यावर वाहतूक थेट सेंट्रल एव्हेन्यू, एलआयसी चौक आणि रिझर्व्ह बँक चौकाकडे वळवली जाईल. त्यामुळे रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे. पूल तयार झाला असेल तर तो लवकर सुरू करावा अशी मागणी नागरिक करीत आहे.
234 कोटींचा हा प्रकल्प
लोहापुल संकुलात रेल्वे अंडरब्रिजचे काम सुरू आहे. दुसऱ्या प्रकल्पात जयस्तंभ चौकापासून वाय आकाराचा पूल आहे. तिसरा प्रकल्प मानस चौक जंक्शनमध्ये सुधारणा करून रस्ता शून्य अपघात स्थळ म्हणून विकसित करणे आणि मानस चौक ते जयस्तंभ चौक दरम्यान 1950 मीटर लांबीचा 6 लेन रस्ता करणे, हे काम अजूनही सुरू झालेले नाही. तसेच चौथ्या प्रकल्पाच्या पार्किंग प्लाझाचे कामही सुरू झालेले नाही. वाय आकाराचा पूल सुरू झाल्याने रेल्वे स्थानक परिसर, टेकडी रोड, रामझुला आणि झिरो माईल टी-पॉइंटची वाहतूक चार भागात विभागली जाणार असून, त्यामुळे सीताबर्डी किल्ल्याभोवती आणि आजूबाजूला होणारी वाहतूक कोंडीची समस्या संपुष्टात येईल.
फिनिशिंगचे काम बाकी
वाय आकाराचा पूल बनून तयार आहे. काही फिनिशिंगचे काम बाकी आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल. पूल सुरू करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. अशी माहिती महामेट्रो चे अखिलेश हळवे यांनी दिली.
जबाबदार ठेकेदाराला शिक्षा करा
शहरातील नागरिकांच्या सहनशीलतेची परीक्षा घेणे योग्य नाही. गेल्या काही वर्षांपासून शहरातील अनेक भागात रस्ते, पूल आदींची कामे सुरू आहेत. कंत्राटदार कंपनीने कामात हलगर्जीपणा केल्याने अनेक प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण झाले नाहीत. याचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. जबाबदार ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी स्थानिक करीत आहे.
प्रशासनाचा दावा
जयस्तंभ चौक ते एलआयसी चौक आणि श्रीमोहिनी कॉम्प्लेक्स चौक- रिझर्व्ह बँक चौकापर्यंत वाय आकाराच्या पूलाचे केवळ काही कामे शिल्लक असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. तरी पूलाच्या उद्घटनाची संपूर्ण नागपुरकरांना आतुरतेने वाट आहे.