
अकोला (Akola) : 45 ते 46 अंश सेल्सिअस तापमान, अंगातून घामाच्या धारा निघत असताना अमरावती ते अकोल दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग 53 वर सलग पाच दिवस काम करून 42 किलोमीटरचा रस्ता तयार करत नव्या विश्वविक्रमाला गवसणी घालण्यात आली. विक्रमी वेळेत करण्यात आलेल्या या रस्त्याच्या कामाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकडून घेण्यात आली आहे. (Guinness World Records 2022 News)
अमरावती ते अकोला येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर राजपथ इन्फ्राकॉनने (Rajpath Infracon) सलग 109.88 तासांत 42.200 किमी बिटूमिनस काँक्रीटचे पेव्हिंग करून नवीन विश्वविक्रम (World Record) प्रस्थापित केला. बुधवारी 7 जूनला माना कॅम्प येथे 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'कडून राजपथ इन्फ्राकॉनचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम यांना 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'चे प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशाचे नाव जागतिक स्तरावर उंचावण्यासाठी राजपथ इन्फ्राकॉनने हे आव्हान स्वीकारले होते. तीन जूनला सकाळी 7 वाजून 27 मिनिटांनी अमरावती जिल्ह्यातील लोणीपासून अखंड बिटूमिनस काँक्रीट पेव्हिंगच्या कामाला सुरवात झाली. 7 जूनला रात्री 9.20 वाजता अकोला जिल्ह्यातील नवसाळ येथे 109.88 तासात पेव्हिंगचे कार्य पूर्ण करून 84.400 किलोमीटरचा विक्रम करण्यात आला. त्यानंतर रात्री फटाक्यांची आतषबाजी करीत एकच जल्लोश करण्यात आला.
विदर्भातील 45-46 अंश तापमानात मागील 5 दिवस सातत्याने आव्हानात्मक ध्येय गाठण्यासाठी, दाहक उन्हाच्या झळा सोसत, रात्रंदिवस एक करणाऱ्या, सर्व अभियंता, अधिकारी आणि कामगारांच्या चेहऱ्यावरील थकवा, तणावाची जागा, विश्वविक्रमाच्या घोषणेनंतर आनंदाने घेतली. गेल्या सहा महिन्यांत, रस्त्याचे चार थर तयार करण्यात आले असून, विक्रमाच्या वेळी हा पाचवा थर टाकण्यात आला.
या विक्रमाची नोंद करण्यासाठी आणि त्यावर लक्ष ठेवण्यासाठी, गिनीज बुक टीमने मंजूर केलेली 22 तज्ज्ञांची चमू तीन शिफ्टमध्ये परीक्षण करीत होती. या तज्ज्ञांमध्ये सर्वेक्षक, अधिवक्ता, टाइम-कीपर, रस्ता अभियांत्रिकी तज्ज्ञ आणि नामांकित महाविद्यालयांचे डीन यांचा समावेश होता. या सर्व कामावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अभियंते लक्ष ठेवून होते.