
नागपूर (Nagpur) : मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदेतून (Nagpur ZP) ग्रामीण भागातील नागरिकांशी संबंधित अनेक योजना जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येतात. परंतु रिक्त पदांमुळे येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर मोठा ताण येतो. त्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा परिषदेत लवकरच 608 जागांची भरती (Recruitment) करण्यात येणार आहे. ही भरती सरळसेवेद्वारे होईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांनाही या संधीचा फायदा होणार आहे.
टप्प्या-टप्प्यात ही पदे भरण्यात येतील. वर्ग तीनची पदे भरण्याचे अधिकार स्थानिक स्तरावर देण्यात आले असून यापूर्वी ही पदे थेट शासन स्तरावरून भरण्यात येणार होती. दरम्यानच्या काळात मराठा व ईडब्ल्यूएस आरक्षण लागू करण्यात आल्याने नव्याने बिंदुनामावली तयार करण्यात आली. परंतु न्यायालयाने मराठा आरक्षण अवैध ठरविल्याने पुन्हा राज्य शासनाने 70 हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यात बदल करावा लागला. त्यामुळे भरती प्रक्रिया रखडली. आता ही भरती प्रक्रिया नियमित होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
रिक्त पदांमुळे एका कर्मचाऱ्याला अनेक पदांचा (टेबलचा) कार्यभार सांभाळावा लागतो. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण येतो. या भरतीमुळे हा ताण कमी होईल. शिवाय शासनाला आवश्यक असणारी माहिती जलदगतीने देता येईल. लोकांची कामेही अधिक गतीने होतील, अशी माहिती ग्रा.पं. लिपिक वर्ग कर्मचारी युनियन, जिल्हाध्यक्ष सुभाष पडोळे यांनी दिली.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी ही गुड न्यूज आहे. मागील वेळेसही जाहिरात काढण्यात आली होती. यंदा ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवाकांना आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी या पदभरती संदर्भात बैठक घेतली. विभागनिहाय भरण्यात येणाऱ्या पदांचा आढावा घेतला. 20 पदनामांच्या 608 जागा भरण्यात येतील. भरती करायच्या जागांना त्यांनी मंजुरी दिली. काही विभागाचे आकृतीबंध नव्याने तयार करण्यात आले. त्यामुळे संबंधित विभागाची बिंदुनामावली मागासवर्ग कक्षाकडून मंजूर करून घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
अशी होणार भरती...
अनुसूचित जाती - 71,
अ.ज. - 52,
वि.मा.प्र. - 10
ई.मा.स. - 81
आ.दु.घ. - 91
खुला - 238 पोस्ट क्र.
अ - 17, ब - 18, क - 16, ड -14