अमरावती (Amravati) : केंद्र सरकार पुरस्कृत अमृत-2 वाढीव पाणीपुरवठा 985.49 कोटींच्या योजनेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला हिरवा झेंडा मिळाला आहे. नगरविकास प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली गठीत राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या बैठकीत या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. आता केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर लवकरच या प्रकल्पाच्या कामांना प्रत्यक्षात सुरूवात होणार आहे. या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष लक्ष देऊन पाठपुरावा केल्याबद्दल आमदार सुलभा खोडके यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
अमरावतीला पाणी पुरवठा करणारी अप्पर वर्धा धरण मोर्शी ते नेरपिंगळाई पर्यंतची डब्लूटीपी पाइपलाइन जुनी लोखंडी असून, शिकस्त झाली आहे. या गुरुत्व वाहिनीचे 30 वर्षांचे आयुष्यमान सन 2024 मध्ये संपुष्टात येत आहे. दरम्यान, वारंवार गळतीमुळे नागरिकांना पाणी पुरवठ्याबाबत गैरसोय होते. त्यामुळे 2055 पर्यंत नियमित व मुबलक जलपूर्तीची दूरदृष्टी बाळगून अमरावती वाढीव पाणी पुरवठा योजना अमृत 2.0 अभियानांतर्गत सिंभोरा हेडवर्क्स ते नेरपिंगळाई संतुलन टाकी ते पुढे तपोवन जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत मृदू पोलादी जलवाहिनी अंथरण्याच्या 985.49 कोटी खर्चाच्या प्रस्तावाबाबत आमदार खोडके यांनी मार्च 2023 च्या अधिवेशनात मुद्दा उपस्थित करून पाठपुरावा केला.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीसुद्धा राज्यस्तरीय उच्चाधिकारी समितीचे प्रमुख तथा मुख्य सचिवांना या प्रस्तावाच्या अनुषंगाने कार्यवाही जलद गतीने पूर्ण करून केंद्र सरकारकडे शिफारस करण्याबाबत योग्य निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आता या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाने कमालीची गती घेतली आहे, हे विशेष. सरकारकडे अमृत-2 वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या पूर्णत्वासाठी सातत्याने पाठपुरावा केला. याचेच फलित म्हणजे राज्याच्या तांत्रिक समितीने मान्यता प्रदान केली आहे. आता केंद्र शासनाकडे हा प्रस्ताव पाठविला असून, अंतिम मान्यतेनंतर प्रत्यक्षात या प्रकल्पाला प्रारंभ होईल. अशी माहिती आमदार रवी राणा यांनी दिली. 11 डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना अमृत-2 वाढीव पाणीपुरवठा 985.490 कोटींच्या योजनेच्या मान्यतेसाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, यासाठी सभागृहाचे लक्ष वेधले होते. येत्या काळात प्रकल्पाचा मार्ग सुकर झाला असल्याची प्रतिक्रिया आमदार सुलभा खोडके यांनी दिली.