
गोंदिया (Gondia) : गोंदिया जिल्हा परिषदेचा (Gondia ZP) 2022-2023 चा 19 कोटी 96 लाख 67 हजार रुपयांचा सुधारीत अर्थसंकल्प (Budget) आणि 2023-24 साठीच्या 11 कोटी 33 लाख 42 हजार 999 रुपयांच्या संभाव्य खर्चाचा पहिला अर्थसंकल्प जिल्हा परिषद अर्थ सभापती संजय टेंभरे यांनी सभागृहात सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात बांधकाम आणि पाणी पुरवठ्याच्या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे.
अर्थसंकल्पात महिला बालकल्याण, समाजकल्याण, पाणी पुरवठा आणि कृषी विषयक योजनांवर तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
जि.प.अध्यक्ष पंकज रहागंडाले यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरवात झाली. जि.प. बांधकाम तथा अर्थ सभापती संजय टेंभरे व मुख्य लेखा वित्त अधिकारी जनार्दन खोटरे यांनी अर्थसंकल्प सादर केला.
या अर्थसंकल्पात समाज कल्याण, ग्रामीण पाणी पुरवठा, महिला व बाल कल्याण व दिव्यांग कल्याणासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली. जिल्हा परिषद सदस्यांना दिल्या जाणारा निधी 8 लाख रुपये करण्यात आला. घड्याळी तासिकेवरील शिक्षक नियुक्तीकरीता 30 लाख रुपयाती तरतूद करण्यात आली आहे.
गोंदिया पंचायत समिती परिसरात दुकाने गाळे बांधकामासाठी 10 लाख रुपयाच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. जि.प. सदस्यांच्या स्थानिक विकास निधीकरीता 2023-24 या वर्षाकरीता 2 कोटी 12 लक्ष रुपयाची तरतूद करण्यात आली आहे.
बांधकाम विभागाकरिता 3 कोटी 63 लाख
या अर्थसंकल्पात बांधकाम विभागाकरिता 3 कोटी 63 लाख 76 हजार, शिक्षण विभागाकरिता 60 लाख 4 हजार, आरोग्य विभागाकरिता 41 लाख 53 हजार, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकरिता 50 लाख, समाजकल्याण विभागाकरिता 67 लाख 90 हजार, दिव्यांग कल्याणासाठी 12 लाख 51 हजार, महिला बालकल्याण विभागाकरिता 24 लाख 9 हजार, कृषी विभागाकरिता 39 लाख 86 हजार, पशुसंवर्धन विभागाकरिता 33 लाख 18 हजार, सामान्य प्रशासन हज विभागाकरिता 2 कोटी 21 लाख 62 हजार, वित्त विभागाकरिता 13 लाख 52 हजार रुपये, पंचायत विभागाकरिता 8 लाख 31 हजार, लघु पाटबंधारे विभागाकरिता 54 लाख 4 हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती सभापती टेंभरे यांनी दिली.