गोंदिया (Gondia) : कोहमारा येथून वाहणाऱ्या शशीकरण नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम मागील एक वर्षापासून रखडल्याने दिवसागणिक पाण्याची पातळी खालावत चालली आहे. सिंचन विहिरी व पिण्याच्या पाणीपुरवठा करणाऱ्या नळ योजना ठप्प पडण्याच्या मार्गावर आहेत. या बंधाऱ्याचे बांधकाम त्वरित सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वाहते पाणी अडवून त्याचा साठा करून भूगर्भातील पाणीसाठ्यात वाढ करणे व त्याचा सिंचनासाठी वापर करून शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करणे, सोबतच पिण्याची पाणी समस्या दूर करणे आदी बाबी विचारात घेऊन सडक अर्जुनी तालुक्यातील कोहमाराजवळून वाहणाऱ्या शशीकरण नदीवर कोल्हापुरी बंधारा मंजूर करण्यात आला.
वर्षभरापूर्वी भूमिपूजन करून बांधकामही सुरू करण्यात आले. मात्र एक वर्षाचा कालावधी लोटूनही बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही. नदीचे पात्र कोरडे पडल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे. सिंचन विहिरी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी नदीवर अवलंबून असलेल्या नळ योजना ठप्प पडण्याच्या मार्गावर आहेत.
नियोजित ठिकाणी बांधकाम होत नसल्याने गावकऱ्यांचा आक्षेप आहे. कोल्हापुरी बंधाऱ्याची आवश्यकता लक्षात घेता कोहमारा येथील ग्रामसभेत व मासिक सभेत गाव जीवनातून वाहणाऱ्या शशीकरण नदीवरील गोंडी घाट या ठिकाणी कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात यावे, असे सर्वानुमते ठरविण्यात आले. या जागेवरील नदीचे दोन्ही काठ टणक मातीचे असून छोटासा टेकडीसारखा भाग आहे. या ठिकाणी बारमाही मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध राहू शकतो. नियोजित जागेवर जलसंधारण विभागाकडून पाणी चाचणीसुद्धा करण्यात आली. मात्र नियोजित जागेवर बांधकाम न करता प्रत्यक्षात दुसऱ्या ठिकाणी बांधकाम हाती घेण्यात आले आहे.
नियोजित ठिकाणीच बंधाऱ्याचे बांधकाम करा...
सध्या ज्या ठिकाणी बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात येत आहे. ती जागा भुसभुशीत लाल मातीचे ठिकाण असून पावसाळ्यात पुराच्या पाण्याने दोन्ही काठांची माती वाहून जाण्याचा धोका आहे. सखल भागात वस्ती असून पुराचे पाणी गावात फिरण्याचा धोका आहे. सोबतच नदीकाठावरील शेतातील पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
साचलेल्या पाण्यामुळे स्मशानभूमी रस्ता पाण्याखाली येण्याची शक्यता आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम पूर्व नियोजित ठिकाणीच करण्यात यावे, अशी मागणी गावकऱ्यांसह माजी जि. प. सदस्य मिलन राऊत यांनी जलसंधारण विभागाकडे केली आहे.