Dada Bhuse : राज्यातील बसस्थानकांचा 2 महिन्यांत करणार कायापालट; लवकरच...

Dada Bhuse
Dada BhuseTendernama

नागपूर (Nagpur) : राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (MSRTC) 251 बसआगार,  577 बस स्थानके आहेत. महामंडळाकडे भाडेतत्त्वावर 467 बस असून, महामंडळाच्या स्व:मालकीच्या 5 हजार 795 बसेस आहेत. या बसेसमधून दररोज 54 लाख प्रवासी प्रवास करीत असतात. एवढे मोठे जाळे असलेल्या महामंडळाच्या बसस्थानकांचे दोन महिन्याच्या आत सुशोभीकरण व पायाभूत सुविधांचा विकास करून रूपडे पालटण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे (Dada Bhuse) यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

Dada Bhuse
तानाजी सावंतांना 'दणका'

राज्यातील बसस्थानकांच्या दुरुस्तीबाबत सदस्य लहू कानडे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेदरम्यान सदस्य प्रकाश आबिटकर, मनीषा चौधरी, सुलभा खोडके यांनी उपप्रश्न उपस्थित केले.

मंत्री भुसे यांनी सांगितले की, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत राज्यातील या 193 बसस्थानकांचे सौंदर्यीकरण व सुशोभीकरण होणार आहे. तसेच बसस्थानकाच्या आवारात काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. यासाठी एमआयडीसी आणि एसटी महामंडळ यांच्या दरम्यान 600 कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला. राज्यात 186 बसस्थानकांचा बीओटी तत्त्वावर विकास करण्यात येणार आहे.

आतापर्यंत 11 टेंडर काढण्यात आले असून दोन कामांना विकासकांचा प्रतिसाद मिळाला आहे.  तसेच 40 टेंडर लवकरच काढण्यात येणार आहेत. बीओटी तत्त्वावरील कामांना प्रतिसाद कमी आहे. याबाबत निवृत्त सनदी अधिकारी सुबोध कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीचा महिनाभरात अहवाल येईल, त्यानंतर या पद्धतीतील त्रुटी दूर करून पुढील कार्यवाही करण्यात येईल.

Dada Bhuse
Sambhajinagar : शहरातील 'या' मुख्य चौकाचा असा होणार कायापालट; पाच कोटींचे टेंडर

मंत्री भुसे यांनी सांगितले की, राज्यात 45 बसस्थानकांचे काम बीओटी तत्त्वावर पूर्ण करण्यात आले आहे. तसेच 72 बसस्थानकांचा विभागाच्या निधीतून विकास करण्यात येत आहे. यामध्ये 70 कामे प्रगतीपथावर आहेत. या वर्षात या कामांसाठी 401 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामधून 97 बसस्थानकांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे.

लोकसहभाग, आपलं गाव आपलं बसस्थानक या संकल्पनांतूनही बसस्थानके सुशोभित करण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात करण्यात आलेल्या बस स्थानकांच्या कामांची तांत्रिक तपासणी करण्यात येवून यामध्ये दोषी आढळलेल्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही भुसे यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com