
नागपूर (Nagpur) : पंचायत राज समिती नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्याने जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. आपल्या कामात उणिवा सापडू नये याची खरबदारी घेतली जात आहे. दुसरीकडे पीआरसीला खुश करण्यासाठी कंत्राटदारांना सरबराई करण्यास सांगण्यात आले आहे. आपले घोटाळे झाकण्यासाठी कंत्राटदारांनाही काळजी घ्यावी लागत असून सर्वांचेच टेन्शन वाढले आहे.
वर्षभराच्या कामकाजाचा लेखाजोखा तपासण्यासाठी पंचायत राज समिती ७ ते ९ एप्रिल अशा तीन दिवसांच्या दौऱ्यावर नागपूरला येत आहे. या दरम्यान राज्य सरकारच्या निधीतून झालेल्या सर्व कामांचे हिशेब तपासले जाणार आहेत. समितीमध्ये आमदारांचा समावेश असतो. समितीच्या अहवालावर बरेच काही अवलंबून असते. विधिमंडळाच्या या समितीतीमध्ये आमदारांचा समावेश असतो. समितीच्या नकारात्मक अहवालावर विधानसभेत चर्चा होऊन चौकशीचाही ससेमिरा लागतो. त्यामुळे समितीच्या देखभालाची सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेला घ्यावी लागते.
पंचायत राज समितीसाठी सर्व दस्तावेजांची जमवाजमव केली जात आहे. त्याकरिता जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकाऱ्यांच्या सार्वजनिक सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
गुढीपाडव्याचीसुद्धा सुटी रद्द करण्यात आली होती. त्यामुळे चांगलाच असंतोष उफाळून आला होता. मात्र आपली विकेट जाऊ नये याकरिता सर्व कर्मचारी सध्या शांत बसले आहेत.
जिल्हा वर्षभरात अनेक घोटाळे गाजले आहेत. सुरक्षा ठेव घोटाळ्यात जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. त्यांना मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू केली आहे. मुदतीपूर्वीच सुरक्षा ठेव रक्कम काढून दुसरे कंत्राट घेण्यासाठी त्याचा वापर कंत्राटदार करीत होते. सुरक्षा ठेवीच्या डीडीची रंगीत झेरॉक्स काढून ती फाईलमध्ये ठेवल्या जात होती.
मूळ डीडी मात्र परत घेतला जात होता. याकरिता अनेक अधिकारी व कर्मचारी कंत्राटदारांना मदत करीत असल्याचे उघडकीस आले आहे. जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात सर्ससपणे सर्वच कंत्राटदार हा प्रकार करीत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. सुरक्षा ठेव घोटाळ्यासोबत इतर घोटाळे चव्हाट्यावर येऊ नये याकरिता प्रशासनाच्यावतीने कंत्राटदारांचीच मदत घेण्यात येत असल्याचे समजते. समितीला जे काही लागते ते द्यावे अशा सूचना कंत्राटदारांना देण्यात आल्या आहेत. समिती नाराज होणार नाही याची काळजीही कंत्राटदारांना घ्यायची आहे. त्यामुळे अनेक कंत्राटदारांचे टेंशन वाढले आहे.