Nagpur : जलजीवन पाणीपुरवठा योजनेच्या कामात अनियमितता; उन्हाळ्यात पाणी मिळेल?
नागपूर (Nagpur) : नागपूर जिल्ह्याच्या पारशिवनी तालुक्यात जलजीवन पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या विहिरीच्या बांधकामात निकृष्ट दर्ज्याची सामग्रीचा उपयोग केल्याचे समोर आले आहे. विहीर पूर्ण तयार होण्याआधीच विहीरीला मोठ मोठ्या भेगा जागोजागी पडल्या आहेत. 95 लाख रुपये खर्च करून जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजनेतून विहिरीचे काम केले गेले. परंतु विहिरीचे काम पूर्ण होण्याआधीच बांधकामात अनियमितता झाल्याचे आढळले, त्यामुळे गावातील लोकांनी विहीरीचे काम बंद करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पारशिवनी तालुक्यातील भुलेवाडी बिलोरी गट ग्रामपंचायत अंतर्गत बिटोली येथे गावात जल जिवन पाणी पुरवठा योजनेंतर्गत विहीर खोदकाम बांधकाम करण्यात येत असुन या पाणी पुरवठा योजनेकरीता 95 लाख रुपये खर्च अपेक्षित असुन विहिरीच्या बांधकामाला मागील वर्षात सुरुवात करण्यात आली. मात्र विहीरी अर्धवट तयार होण्याआधीच विहीरीच्या बांधकामात जागोजागी आर पार मोठ्या भेगा पडल्या असुन विहिरी तयार होण्याआधिच मोडकळीस आली आहे. संबंधित ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अभियंता या कामावर लक्ष देत नसल्याचे दिसत आहे.
निकृष्ट दर्ज्याचे विहिरीचे बांधकाम करण्यात येत असल्याने संबंधित ठेकेदार व अभियंता संगनमत करुन 'कामात हात ओले केले तर जात नाही ना!' असा गावकऱ्यांना प्रश्न उपस्थित होत आहे. बिटोली येथील लोकांना विहिरीचे काम निकृष्ट होत असल्याचे दिसुन येताच त्यांनी एकत्र येत विहिरीचे काम बंद करण्यात यावे अशी मागणी केली. याबाबत संबंधित विभागाच्या अभियंता व वरिष्ठ अभियंता यांना विचारणा केली असता उडावाउडविचे उत्तर दिली गेली. जलजीवन पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून गावाला पाणीपुरवठा करिता विहिरीचे बांधकाम केले जात असुन तयार करण्यात येत असलेली विहीरीला जगोजागी मोठमोठ्या आर पार भेगा पडल्या असल्याचे बिटोली निवासी धर्मपाल दिवटे यांनी सांगितले. याबाबत प्रत्यक्ष ग्रामीण पाणीपुरवठा उप विभागीय अभियंता इंगळे यांना तक्रार केली. तसेच सहायक अभियंता यांच्या सुद्धा ही बाब लक्षात आनुन दिली. पण तक्रारीची दखल न घेतल्यास हा प्रकार घडला.
या संबंधित जिल्हा परिषद पाणीपुरवठा उप विभाग पारशिवनी येथील उप विभागीय अभियंता इंगळे यांनी सांगितले, की जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीचे काम सुरु आहे. या बांधकाम होत असलेल्या विहिरीला आरपार भेगा पडल्या आहेत अशी तक्रार प्राप्त झाल्याने तात्काळ या बांधकामाची पाहणी करुन योग्य तो निर्णय घेतला जाईल.