भंडारा (Bhandara) : अत्यंत रहदारीचा व गोंदिया-रामटेक महामार्गाला जोडणाऱ्या खांबतलाव रस्त्याचे हाल बेहाल झाले आहेत. भरलेली चुरीही रस्त्यावर विखुरल्याने रोज लहान मोठे अपघात घडत आहेत. बायपास रस्ता म्हणूनही ओळखला जाणाऱ्या हा मार्ग धोक्याचा ठरला आहे.
कोरोना काळापुर्वीच म्हणजे 2019 ला भंडारा-ते रामटेक या महामार्गाच्या दर्जाप्राप्त रस्त्याचे बांधकाम झाले. मात्र राजीव गांधी चौकाहून खांबतलावाकडे जाणाऱ्या रस्त्याचे बांधकाम होवू शकले नाही. जवळपास अर्धा किलोमीटरचा हा रस्ता नागरिकांसाठी मृत्यू मार्ग ठरत आहे. रस्त्याच्या अशा अवस्थेमुळे गत गेले आहे. दोन वर्षात पाच जणांना जीवही गेला आहे. अनेकदा बांधकाम विभागाला यासंदर्भात सांगण्यात आले. मात्र माशी कुठे शिंकली माहिती नाही. निविदा व टेंडर कामे झाली असल्याचे सांगण्यात येते. परंतु कामे रखडलेलीच आहेत. महिन्याभरापुर्वी खड्डे पडलेल्या या मार्गावर चुरी व भरण घालण्यात आले. मात्र ते भरणही आता रस्त्यावर विखुरले गेले आहे.
सर्वात वाईट स्थिती खांबतलाव चौकाची आहे. येथे चहुबाजूने आलेले वाहन एकदम कधीच दिसत नाही. परिणामी अपघाताची दाट शक्यता असते. रस्ता बांधकामासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे सांगण्यात येत असले तरी मग बांधकाम का थांबले आहे, याचे उत्तर कुणाकडेही नाही. पावसाळा संपून एक महिनांचा कालावधी लोटला आहे. मात्र रस्ता बांधकामाचा मुहूर्त निघालेला नाही. अनेक लहान मोठे अपघात घडूनही या रस्त्याची डागडुजी किंवा नव्याने बांधकाम करण्यात यावे, अशी शहरवासीयांची प्रमुख मागणी आहे.