Bhandara : प्रसिद्ध आंभोरा रोपवे सुरू होताच का झाला बंद?
भंडारा (Bhandara) : पाच नद्यांचा संगमावर दोन जिल्ह्यांना जोडणारा आंभोरा येथील वैनगंगा नदीवरील विलोभनीय रोपवेचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याच्या कारणावरून पंधरा दिवसांपूर्वी पायी व दुचाकीस्वारांसाठी सुरू झालेला पूल पुन्हा बंद करण्यात आला आहे. परिणामी परिसरातील नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
अनेक लोकांनी हाच मार्ग निदान पायदळ, अतिगरजू लोकांसाठी खुला करावा, यासाठी प्रयत्न केले होते. मागणीनुसार गरजूंना लाभ व्हावा, यासाठी पायदळ व दुचाकी वाहनांना ये-जा करण्यासाठी दोन्ही मार्गावरील कठडे जशास तसेच ठेवून मुभा पहिल्यांदाच देण्यात आली होती.
23 जुलैपासून सलग पाच दिवस या पुलावरून रहदारी सुरू होती. त्याचवेळी कसा तरी सुरू झालेला रोपवे महामार्ग आता लवकरच बंद होण्याच्या मार्गावर येण्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. 6 ऑगस्ट रोजी निघालेल्या पत्रानुसार राहिलेला काम पूर्ण करण्यास पुन्हा सुरुवात झाली. त्यामुळे पुलावरून पायदळ किंवा दुचाकी वाहतूक सुरू राहिल्यास अपघात किंवा जीवितहानी होण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही.
याकरिता लोकांच्या हितार्थ तसेच सदर पुलावर काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काम पूर्ण होईपर्यंत पुलावरून पायदळ व दुचाकी वाहतूक बंद करण्यात येत आहे, असे पत्र सार्वजनिक बांधकाम उपविभाग कूही येथील सहायक अभियंता अ. दि. अलचद्वार यांनी काढले आहेत.
रोपवे बघायला पर्यटकांची गर्दी
प्रसिद्ध रोपवे सुरू झाल्याची चर्चा, फोटो व्हिडीओ व्हायरल झाल्या पासून आजपर्यंत येथे शेकडो वाहन व हजारो पर्यटनप्रेमींनी भेट दिली आहे. आता पुन्हा कामाला लगेच सुरुवात झाल्याने तेथील वाहतूक व पायदळ जाणाऱ्यांना आता जाता येणार नाही. आता सुरू असलेले बांधकाम केव्हा पूर्ण होते आणि केव्हा पूल सुरू होतो, याकडे ग्रामस्थांच्या नजरा लागल्या आहेत.