
भंडारा (Bhandara) : भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख उद्योगांपैकी एक असलेला बिडी उद्योग पूर्णत: मोडकळीस आला असून, या व्यवसायात गुंतलेल्या हजारो बिडी मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. नामांकित बिडी कंपन्यांनी त्यांचे जिल्ह्यातील कारखाने बंद केले असून, मजुरांसह कारखान्यातील कर्मचारी आणि कंत्राटदारांवरही आर्थिक संकट ओढवले आहे.
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल पसरले असून, या जंगलातून तेंदूपत्ता मिळतो. तेंदूपत्त्याची मुबलकता लक्षात घेऊन या दोन्ही जिल्ह्यात बिडी उद्योग फोफावले. दोन्ही जिल्ह्यात सी. जे. पटेल अॅन्ड कंपनी, गोंदिया, मोहनलाल हरगोविंद दास (जलबपूर) आणि पी. के. पोरवाल कंपनी (कामठी) या तीन नामांकित कंपन्यांनी कंत्राटदार नियुक्त केले होते.
मजुरांना तेंदूपाने, तंबाखू आणि सुताचा पुरवठा करायचा व मजुरांनी तयार केलेल्या बिड्या घेऊन त्या कारखान्यात पुरवायच्या, असा हा उद्योग दोन्ही जिल्ह्याच्या शेकडो गावात चालायचा. मोठ्या कंपन्यांचे बंदर बॅग, संजीव आणि असेच अनेक ब्रॅन्ड होते. स्थानिक पातळीवरही गेंडा, टायगर, चिता या नावाने काही लघुद्योगही उभे झाले होते. ग्रामीण भागातील हा बिडी उद्योग पूर्णत: मोडकळीस आला आहे.
पोरवाल, सी. जे. पटेल कंपन्यांकडे कार्यरत कर्मचारी, व्यवस्थापक आणि कंत्राटदारही रस्त्यावर आले आहेत. कारखानेच बंद झाल्याने हजारो कुटुंबावर उपामारीची पाळी आली आहे.
बिडी उद्योगावर अवकळा आल्याने आणि कंपन्यांतील उद्योग गुंडाळल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो मजुरांची अक्षरश: फरपट सुरू आहे. बिड्या वळण्याशिवाय दुसरे काम जमत नसल्याने या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. बहुतेक मजूर आता रोजगार हमी योजना आणि अशाच मोलमजुरीच्या कामावर जात आहे.
तेंदूपत्ताचे पुडे करणे, पाने कापणे, बिड्या वळणे, कट्टे किंवा चुंगळ्या तयार करणे, ही कामे बैठ्या स्वरुपाची असल्याने शेकडो मजुरांना मणक्याचे आजार जडले आहेत. शिवाय सातत्याने तंबाखूच्या संपर्कात असल्याने अनेक जण फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त आहे. बिडी मजुरांसाठी भंडारा जिल्ह्यातील तुमसर आणि भंडारा येथे कामगार खात्याचे रुग्णालय असले तरी, त्याचा कोणताही लाभ मजुरांना होत नाही.
विविध कारणांचा उद्योगाला फटका
भंडारा व गोंदिया जिल्ह्यात एकेकाळी घराघरात पोहोचलेला बिडी वळण्याचा व्यवसाय मोडकळीला आणण्याला शासनाच्या धोरणाबरोबरच नक्षलवादी चळवळही कारणीभूत आहे. धूम्रपानाबाबत शासनाचे नियम, धूम्रपानच्या दुष्परिणामाविषयी झालेली जागरूकता, जडणारे आजार यामुळे विड्या ओढणाऱ्यांचे प्रमाण बरेच कमी झाले. त्याचबरोबर कंपन्यांतील वाढत्या स्पर्धेतून बिडीच्या किमतीत सिगारेट मिळू लागली.
शासनाने तंबाखूवर मोठ्या प्रमाणात शुल्क आकारल्याने कारखानदारांनाही हा व्यवसाय फायद्याच्या राहिला नाही. त्यातच राजकारणाने त्यात शिरकाव केला, बिडी कामगारांनी मजुरी वाढविण्याबरोबरच त्यांना अन्य सोयीसुविधा पुरवण्यासाठी आंदोलन उभे झाले. बिडी कामागारांच्या संघटना तयार झाल्या.