अमरावती (Amravati) : जिल्हा परिषदेने 2024-25 या वर्षातील रोजगार हमी योजनेचा 10 हजार 105 कोटी 35 लाख 70 हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे. त्याला जिल्हा परिषद सीईओ तथा प्रशासक यांनी 15 मार्च रोजी मंजुरीही दिली आहे. या आराखड्यात 5 लाख 29 हजार 142 कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यामुळे गावोगावच्या नागरिकांच्या हाताला काम मिळणार आहे.
ग्रामीण भागातील बेरोजगारांना गावातच हक्काचा रोजगार मिळावा, या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामे करण्याची मुभा ग्रामपंचायतींना दिली. यासाठी ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात आहे.
रोजगार हमी योजनेतून ग्रामीण शेतकरी, शेतमजुरांना सामाजिक सुरक्षा, महिला आणि दुर्बल घटकांचे सक्षमीकरण आणि पंचायतराज संस्थांना बळकट केले जात आहे. रोहयो अंतर्गत 2024-25 या वर्षातील कामांचे नियोजन केले आहे. ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभा पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सीईओ तथा प्रशासक संजिता मोहपात्रा यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे यंदा लाखो मजूरांच्या हाताला गावपातळीवरच रोजगार उपलब्ध होणार आहे.
तालुकानिहाय समाविष्ट कामे
जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेच्या वार्षिक कृती आराखड्यात तालुक्यातील कामांचा समावेश केला आहे. अचलपूर 99993, अमरावती 20587, अंजनगाव सुर्जी 17187, भातकुली 54600, चांदूर रेल्वे 3493, चांदूर बाजार 18970, चिखलदरा 106832, दर्यापूर 12072, धामणगाव रेल्वे 4173, धारणी 56187, मोर्शी 29143, नांदगाव खंडेश्वर 41364, तिवसा 20381, वरूड 44210 अशी एकूण 5 लाख 29 हजार 142 वैयक्त्तिक व सार्वजनिक कामांची संख्या आहे.
आराखड्यात या कामांचा समावेश
आराखड्यात काँक्रिट रस्ता, ग्रामपंचायत विहीर पुनर्भरण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, ग्रामपंचायत भवन, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, नाला खोलीकरण, पाणंद रस्ता, पेव्हर ब्लॉक बसविणे, फळबाग लागवड, बंदिस्त गटार, वृक्षलागवड, नाडेफ खत, सार्वजनिक शेततळे, सार्वजनिक शोषखड्डा, सिमेंट बंधाऱ्यातील गाळ काढणे, ओढा खोलीकरण, तलाव गाळ काढणे, दगडी बांध, माती नालाबांध, सीसीटी, अंगणवाडी इमारत, रोपवाटिका, शालेय स्वयंपाक घर, शाळा अंगणवाडी किचन शेड, शाळा परिसर बंदिस्त गटार, शाळा परिसरात शोषखड्डा, संरक्षण भिंत, गांडूळ खत युनिट, कुक्कुटपालन शेड, बांबू लागवड, सिंचन विहीर अशी कामे केली जाणार आहेत.