अमरावती (Amravati) : राज्य शासनाच्या 'शासन आपल्या दारी' या उपक्रमासाठी जवळपास पाच कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. अंबानगरीत 26 नोव्हेंबरला शासनाच्या विविध विभागांमार्फत सायन्सकोर मैदानावर आयोजित या कार्यक्रमासाठी तब्बल 60 लाख रुपये खर्चून भव्यदिव्य व्यासपीठ उभारले जाणार आहे. त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) टेंडर (Tender) काढले आहेत.
राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी नागरिकांना लागणारे दस्तऐवज मिळविण्यासाठी प्रशासकीय विभागाचे उंबरठे झिजवावे लागतात. अशातच या सर्व विभागांची कार्यालयेसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. त्यामुळे कागदपत्रे मिळविताना नागरिकांची मोठी कसरत होते. यात वेळ वाया जात असून, आर्थिक खर्च अधिक येतो.
याशिवाय कागदपत्रांतील त्रुटी पूर्ण करताना दमछाक होते. त्यामुळे नागरिकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करण्यासोबतच वेळ आणि खर्च करावा लागतो. हा वेळ व त्रास 5 वाचविण्याच्या उद्देशाने 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याकरिता प्रशासकीय यंत्रणेने जोरदार तयारी चालविली आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्याकडे धुरा असणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील विधान परिषद, विधानसभेच्या सदस्य आमदार विकास निधीतून प्रत्येकी 20 लक्ष रुपये निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने पत्र दिले आहे.
अशी राहणार व्यवस्था
सायन्सकोर मैदानात या कार्यक्रमासाठी भव्य व्यासपीठासह विविध विभागांची तात्पुरती कार्यालये उभारली जाणार आहेत. जिल्ह्यातून लाभार्थ्यांया ने-आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था शासनाच्या खर्चातून करण्यात येणार आहे. कार्यक्रमस्थळी लाभार्थ्यांसाठी भोजनासह आसन व आरोग्य व्यवस्थाही शासनाच्या निधीतून करण्यात येत आहे.
व्यासपीठ व आसन व्यवस्थेसह मंडप उभारणी, वाहतूक व्यवस्था, आरोग्यसुविधा, कार्यक्रमस्थळी स्वच्छता, शौचालय, वीज व सुरक्षा, खाद्यान्न तसेच पाणी आणि आसन व्यवस्था केली जाणार आहे. त्याकरिता 60 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या सर्व व्यवस्थेची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविली असून, या विभागाने या अनुषंगाने टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे. 20 नोव्हेंबरला टेंडर उघडल्या जाणार असून, 17 नोव्हेंबरपर्यंत त्यासाठी अर्ज मागविले आहेत.
विविध समित्यांचे गठण
शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी विविध प्रकारच्या समित्याही गठीत करण्यात आल्या आहेत. यात स्वागत समिती, वाहतूक समिती, भोजन व्यवस्था, वैद्यकीय सेवा समिती यासह अन्य व्यवस्थेसाठीची जबाबदारी विविध विभागावर सोपविली आहे.