
भंडारा (Bhandara) : केंद्र व राज्य सरकारतर्फे राज्यात राबविण्यात येणाऱ्या पीएमश्री शाळा योजनेसाठी भंडारा जिल्ह्यातील शाळांचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यातून प्राथमिक चाचणी होऊन अंतिम निवडीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 14 शाळा पात्र ठरल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाकडून प्राप्त झाली आहे. येत्या काळात या शाळांचा 'आदर्श शाळा' म्हणून विकास केला जाणार असून, दर्जात्मक आणि गुणात्मक शिक्षणासह शाळांच्या भौतिक विकासावर भर देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील निवड झालेल्या 14 शाळांना प्रत्येकी 2 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे.
राज्यातील शाळांचा सर्वागीण विकास करण्यासाठी पीएम श्री योजना राबविली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा मूलभूत गुणवत्तापूर्ण विकास करण्याबरोबरच त्यांच्यात आमूलाग्र बदल घडवून उच्च दर्जाचा शैक्षणिक विकास साधने, अनुभवात्मक पद्धतीने आनंददायी शिक्षण देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेंतर्गत भंडारा जिल्ह्यातील 14 शाळांची निवड प्रथम टप्प्यांत झाली आहे. यात भंडारा तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथिमक शाळा वाकेश्वर व जिल्हा परिषद उच्च प्राथिमक शाळा गोपीवाडा, मोहाडी तालुक्यातील बेटाळा व आंधळगाव येथील जिल्हा परिषद शाळा, तुमसर तालुक्यात दोन शाळामध्ये एक देव्हाडी येथील जिल्हा परिषदची तर, तुमसर येथील नगरपरिषद नेहरू शाळेचा समावेश आहे.
याप्रमाणेच पवनी तालुक्यातील दोन शाळांमध्ये नगरपरिषद विद्यालय पवनी व भुयार येथील जिल्हा परिषद शाळा, लाखांदूर तालुक्यातील विरली बूज व मडेघाट येथील जिल्हा परिषद शाळा, साकोली तालुक्यात दोनही शाळा जिल्हा परिषदच्या असून लवारी व सानगडीचा यात समावेश आहे. तर लाखनी तालुक्यातील लाखनी व गडेगाव येथील जिल्हा परिषद शाळांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या शाळांच्या भौतिक प्रकारच्या सर्व सुधारणेसाठी काम करण्यात येणार आहे.
असा होणार शाळांना लाभ
इमारत दुरुस्ती, स्मार्ट वर्गखोल्या, मुली, मुले तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृह, संरक्षण भित, सौरऊर्जा, सायन्स लॅब, संगणक लॅब, डिजिटल ग्रंथालये आदी सर्व भौतिक सुविधांसाठी शाळेच्या गरजांनुसार शासनाकडे प्रस्ताव सादरीकरण करण्यासाठी कार्यवाही सुरु करण्यात आल्याची माहिती आहे. पीएम श्री स्कूल योजनेंतर्गत जिल्ह्यातील बेंचमार्क यादीतील 257 शाळांपैकी 170 शाळांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी 105 शाळा गुणानुक्रमे पात्र ठरल्या होत्या. पात्र ठरलेल्या शाळांची पडताळणी करून त्यांच्याकडून प्राप्त प्रमाणपत्राच्या आधारे जिल्ह्याने 93 शाळांना अप्रोव्ह केले. या योजनेअंतर्गत प्रत्येक तालुक्यातून तीन याप्रमाणे शाळांना भेटी देऊन तपासणी केलेली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 14 शाळांची निवड केली आहे. अशी माहिती भंडारा जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी यांनी दिली.
या आधारावर होणार शाळांचा विकास
अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र व मूल्यमापन, प्रवेश आणि पायाभूत सुविधा, मानव संसाधन आणि शालेय नेतृत्व, समावेशक पध्दती आणि लैंगिक समाधान, व्यवस्थापन, देखरेख आणि प्रशासन, लाभार्थी उपाय, क्रिडांगणाच्या माध्यमातून विकास केला जाणार आहे.