'या' वादग्रस्त पुलामुळे शिंदे गट-भाजपमध्ये येणार दुरावा?

Devendra Fadnavis Eknath Shinde
Devendra Fadnavis Eknath ShindeTendernama

नाशिक (Nashik) : नाशिक महापालिका (NMC) हद्दीत बांधलेल्या अनेक पुलांमुळे गोदावरीची (Godavari) पूरपातळी वाढली असल्याचे तज्ज्ञ संस्थांनी स्पष्ट केले आहे. तरीही गोदावरी नदीवरील प्रस्तावित वादग्रस्त पुलासाठी खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godase) प्रयत्नशील आहेत. यामुळे या पुलाविरोधात भाजपच्या आमदार देवयानी फरांदे (BJP MLA Devayani Farande) यांनी भूमिका घेतली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि त्यानंतरचे तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी रद्द केलेल्या या पुलाच्या उभारणीचा पुन्हा घाट घातल्यास येत्या हिवाळी अधिवेशनात त्याविरोधात आवाज उठवण्याची भूमिका फरांदे यांनी जाहीर केली आहे. या पुलाची गरज नसल्याची बाब सरकारच्या लक्षात आणून देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे नाशिकमध्ये भाजप व बाळासाहेबांची शिवसेना या सरकारमधील पक्षांमध्ये गोदावरीवरील संभाव्य पुलामुळे दुरावा निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

Devendra Fadnavis Eknath Shinde
नागपुरात पंतप्रधान मोदी मेट्रोतून प्रवास करणार का?

महापालिका प्रशासनाने २०१९ पूर्वी गोदावरीवर दोन नवीन पुलांचे प्रस्ताव तयार केले होते. त्यात जेहान सर्कलपासून नरसिंहनगरमार्गे आभाळे मळा, शिंदेमळा दरम्यान ३० मीटर डीपी रोडवर व गंगापूर रोडवरील जुने पंपिंग स्टेशन ते मखमलाबाद या दरम्यान अनुक्रमे २०.८५ कोटी रुपये व १४.९८ कोटी रुपये खर्चातून दोन पुलांची उभारणी करण्यात येणार होती. यामुळे गोदावरी नदीवर महापालिका हद्दीतील दीड किलोमीटर परिसरात आधीच्या पाच पुलांमध्ये आणखी दोन पुलांची भर पडणा होती. गोदावरीवर गंगापूर रोड ते चांदशी, मखमलाबाद, पंचवटी परिसराला जोडणारे आनंदवली पूल, बापू पूल, फॉरेस्ट नर्सरी पूल, चोपडा लॉन्स पूल, रामवाडी पूल उभारण्यात आलेले आहेत. सीडब्ल्यूपीआरएसच्या अहवालानुसार दीड किलोमीटर लांबीच्या गोदावरी नदीपात्रावरील या पाच पुलांमुळे नदीच्या पूर पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे गोदावरी नदीवर आणखी पूल उभारल्यास पूरपातळी आणखी वाढून नदीकाठच्या हजारो नागरिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता होती. यामुळे नागरिकांनी या पुलाला विरोध करीत न्यायालयात याचिकाही दाखल केली होती.

Devendra Fadnavis Eknath Shinde
औरंगाबाद नवीन पाणीपुरवठा योजनेवर कऱ्हाडांनी खडसावले, न्यायालयाने..

लोकभावना लक्षात घेऊन आमदार देवयांनी फरांदे यांनीही प्रस्तावित पुलाला विरोध दर्शविला होता. न्यायालयाने या पुलाबाबत सरकारचा अहवाल मागवल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री, तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या पुलाला स्थगिती दिली. दरम्यान, राज्यात भाजप व बाळासाहेबांची शिवसेना या पक्षांची युती होऊन सरकार आले असताना खासदार हेमंत गोडसे यांनी पुन्हा त्या वादग्रस्त पुलाच्या उभारणीस चालना देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यामुळे भाजप आमदार देवयानी फरांचे यांनीही या पुलाला विरोधाची भूमिका कायम असल्याचा पुनरुच्चार केला आहे. मूठभर लोकांसाठी जनतेच्या पैशांची उधळपट्टी केली जात असेल, तर त्याविरोधात हिवाळी अधिवेशनातही मुद्दा उपस्थित केला जाईल, असा इशारा फरांदे यांनी दिला. यामुळे नाशिकमध्ये शिंदे गट विरुद्ध भाजप या सामन्याची सुरवात होण्यास पूल कारणीभूत करण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com