
नाशिक (Nashik) : रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण व्हावे यासाठी रेल्वे बोर्डाने अमृत भारत स्टेशन योजना आणली आहे. या योजनेंतर्गत मुंबई रेल्वे विभागातील पंधरा रेल्वे स्थानकांचे अत्याधुनिकरण होणार असून यात जिल्ह्यातील इगतपुरी रेल्वे स्थानकाचा समावेश आहे.
खासदार हेमंत गोडसे यांनी रेल्वे बोर्डाकडे पाठपुरावा करून इगतपुरी रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्टेशन योजनेत समावेश करून घेतला आहे. येत्या काही दिवसात इगतपुरी रेल्वे स्थानकात सर्व प्रकारच्या सोयी -सुविधा निर्मिती करण्याच्या कामाला प्रत्यक्ष प्रारंभ होणार आहे. वर्षभरात इगतपुरी रेल्वे स्थानकाचे रुपडे पूर्णतः बदलणार आहे. यामुळे इगतपुरी शहराच्या आर्थिक भरभराटीस चालना मिळणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून इगतपुरी रेल्वेस्थानकाची दुरवस्था झालेली आहे. प्रवाशांसाठी योग्य त्या सोयी- सुविधा रेल्वेस्थानकावर उपलब्ध नसल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. रेल्वे स्थानकाचे रूपडे बदलण्यासाठी या स्थानकाचा अमृत बाजार स्थानकात योजनेत समावेश होण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून खासदार हेमंत गोडसे सतत प्रयत्नशील होते. त्यांच्या प्रयत्नांना आता यश आले आहे. मुंबई रेल्वे विभागातील पंधरा रेल्वे स्थानकांचे अमृतभारत स्टेशन योजनेंतर्गत अत्याधुनिकरण होणार आहे. यामध्ये इगतपुरी रेल्वेस्थानकाचा समावेश आहे. येत्या दोन महिन्यात रेल्वे स्टेशनच्या अत्याधुनिक कामाचे प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. वर्षभरात इगतपुरी रेल्वे स्थानकाचे अत्याधुमिक अत्याधुनिकरण पूर्ण होणार आहे. येत्या महिनाभरात रेल्वे स्टेशनच्या आधुनिकीकरणाचा मास्टर प्लॅन तयार करण्यात येणार आहे.
रेल्वे स्टेशनच्या अत्याधुनिकीकरणामध्ये प्रवेशव्दार, फेरीवाले क्षेत्र, वातानुकूलित वेटिंग हॉल, शौचालये, एस्केलेटर, वाय-फाय सुविधा, व्हीआयपी कक्ष, वातानुकूलित व्यवसायिक स्टॉल, इमारत सुधारणा, मल्टीमॉडम इंटिग्रेशन, दिव्यागंसाठी विशेष सुविधा, शहराच्या दोन्ही बाजूंनी स्टेशनचे एकत्रिकरण, शाश्वत व पर्यावरणपूरक अशा सोयीसुविधांची निर्मिती करण्यात येणार आहे. येत्या वर्षभरात इगतपुरी रेल्वे स्थानकाला नव्याने झळाळी मिळणार असून स्टेशनचे रूपडे पूर्णतः बदलले जाणार आहे. रेल्वे स्टेशनच्या आधुनिकीकरणामुळे प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर विशेष सुविधा मिळणार आहे. इगतपुरी शहराच्या आर्थिक भरभराटीस चालना मिळणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली आहे.