
पिंपरी (Pimpri): पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे काँक्रिटीकरण संथगतीने होत आहे. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. हे काम तातडीने पूर्ण करावे. तो पर्यंत महामार्गावरील तीनही टोल नाके बंद ठेवावेत, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
पुणे-नाशिक महामार्गाची दुरवस्था झाल्याने तीन ते साडेतीन तासांचा प्रवास सहा ते नऊ तासांपर्यंत वाढला आहे. संगमनेर-पुणे या मार्गासाठी सध्या चार ते पाच तास; तर संगमनेर- नाशिक प्रवासासाठी दोन तासांहून अधिक वेळ लागत आहे. या कामातील विलंबामुळे वाहनधारकांना दररोज धोकादायक प्रवास करावा लागत आहे,’’ असा दावा आमदार तांबे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
‘‘या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी आणि कामाला गती देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. १० जुलै २०२५ रोजी पावसाळी अधिवेशनात ही मागणी मांडली. २५ जुलै रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन लोकांचा आक्रोश त्यांच्यापर्यंत पोचविला. त्यानंतर ३० सप्टेंबरला पुन्हा गडकरी यांना या विषयात वैयक्तिक लक्ष घालण्याची विनंती केली होती,’’ असे तांबे म्हणाले.